कोळीकोड : महाराष्ट्राच्या कोमल जगदाळे आणि सर्वेश कुशारे यांनी सोमवारी कोळीकोड येथे सुरु असलेल्या फेडरेशन चषक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत चांगली कामगिरी करत आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रतेचे निकष पूर्ण केले.

सर्वेशने उंच उडी प्रकारात २.२५ मीटर अंतर पार करत सुवर्णपदक मिळवले आणि भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या (एएफआय) आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीचा पात्रता निकष पूर्ण केला. दुसरीकडे कोमलने ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात ९:४७.८६ मि. अशा सर्वोत्तम वेळेची नोंद करत आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता निकष पूर्ण करण्याची कामगिरी केली.

अन्य क्रीडा प्रकारांत, आंध्र प्रदेशच्या ज्योती याराजीने महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत १३.०८ सेकंद वेळेची नोंद करत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. ज्योतीने अनुराधा बिस्वालचा (१३.३८ सेकंद) विक्रम मोडीत काढला.