झ्वेरेव्ह, गॉफ यांची आगेकूच; मरेचे आव्हान संपुष्टात

एपी, लंडन

‘हिरवळीवरील सम्राट’ म्हणून ओळखल्या जाणारा स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि अमेरिकेची किशोरवयीन टेनिसपटू कोको गॉफ यांनी शनिवारी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. याव्यतिरिक्त अलेक्झांडर झ्वेरेव्ह, अँजेलिक कर्बर आणि मॅडिसन कीज यांनीदेखील पुढील फेरी गाठली. मात्र ब्रिटनच्या अनुभवी अँडी मरेला गाशा गुंडाळावा लागला.

महिला एकेरीत २०व्या मानांकित गॉफने कॅजा जुव्हानला ६-३, ६-३ अशी सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली. १७ वर्षीय गॉफने २०१९मध्येसुद्धा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. आता गॉफला प्रथमच विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची संधी असून तिच्यापुढे जर्मनीच्या कर्बरचे आव्हान असेल. २५व्या मानांकित कर्बरने अ‍ॅलेक्झांड्रा सास्नोव्हिचला २-६, ६-०, ६-१ असे पिछाडीवरून नमवले. अमेरिकेच्या २३व्या मानांकित किजने १३व्या मानांकित एलिस मर्टेन्सला ७-५, ६-३ असे पराभूत केले. फ्रेंच विजेत्या बाबरेरा क्रेजिकोव्हाने अनास्तासिया सेव्हास्टोव्हाला ७-६ (७-१), ३-६, ७-५ असे हरवले.

पुरुष एकेरीत आठ वेळा विम्बल्डन जिंकणाऱ्या सहाव्या मानांकित फेडररने २९व्या मानांकित कॅमेरून नॉरीवर ६-४, ६-४, ५-७, ६-४ अशी चार सेटमध्ये मात केली. फेडररसमोर पुढील फेरीत लॉरेंझो सोनेगोचे आव्हान असेल. इटलीच्या सातव्या मानांकित मॅट्टेओ बॅरेट्टिनीने अल्जाझ बेदेनवर ६-४, ६-४, ६-४ असा सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवला. बिगरमानांकित इल्या इव्हाशकाने जॉर्डन थॉम्पसनला ६-४, ६-३, ६-४ असे नेस्तनाबूत केले. पुढील फेरीत इव्हाशकाची बॅरेट्टिनीशी गाठ पडणार आहे. कॅनडाच्या १०व्या मानांकित डेनिस शापोवालोव्हने अनुभवी मरेवर ६-४, ६-२, ६-२ असे वर्चस्व गाजवले. जर्मनीच्या झ्वेरेव्हने टेलर फ्रिट्र्झला ६-७ (३-७), ६-४, ६-३, ७-६ (७-४) असे संघर्षपूर्ण लढतीत नमवले. निक किर्गिओसने दुखापतीमुळे माघार घेतली.

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा

सानिया-बेथानी पराभूत

भारताची सानिया मिर्झा आणि तिची अमेरिकन सहकारी बेथानी मॅटेक-सँड्स यांना महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. आठव्या मानांकित एलिना व्हेस्निना आणि व्हेरोनिका कुदरमेटोव्हा यांनी सानिया-बेथानी यांच्यावर ६-४, ६-३ अशी सहज मात केली. सानियाचे मिश्र दुहेरीतील आव्हान मात्र टिकून असून रविवारी ती बोपण्णाच्या साथीने दुसऱ्या फेरीत खेळणार आहे.