बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी, माजी खेळाडू फारुख इंजिनीअर यांच्या आरोपांवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. "ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवत ८२ वर्षांचा एक ज्येष्ठ खेळाडू आरोप करतो आणि त्यातून असुरी आनंद मिळवतो हे वेदनादायी आहे." प्रसाद पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. गावगप्पांच्या आधारे एखाद्यावर आरोप करायचा आणि त्यातून आसुरी आनंद मिळवायचा हे वाईट आहे. असं वागून तुम्ही निवड समिती आणि भारतीय कर्णधाराच्या पत्नीचा अपमान करत आहात, प्रसाद यांनी पीटीआयशी बोलत असताना आपली बाजू मांडली. अवश्य वाचा - अनुष्का शर्माला चहा देणं हेच यांचं काम, माजी भारतीय खेळाडूची निवड समितीवर खरमरीत टीका इंजिनीअर यांनी पुण्यात दिलीप वेंगसरकर यांच्या क्रिकेट अकादमीला भेट दिली. यावेळी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इंजिनीअर यांनी प्रसाद यांच्या निवड समितीला आपल्या टीकेचं लक्ष्य केलं होतं. “अनुष्का शर्माला कपातून चहा देण्याऐवजी यांनी काहीही काम केलं नाही. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत असंच चित्र होतं. मला हेच कळत नाही, की लोकं निवड समितीवर निवडून येण्यासाठी पात्र कशी ठरली? यांच्यापैकी किती लोकांनी किमान १०-१२ कसोटी सामने खेळले आहेत? त्यांच्यापैकी एकाला तर मी ओळखतही नव्हतो. विश्वचषकादरम्यान हा माणूस कोण आहे? असं विचारल्यावर मला तो निवड समितीचा सदस्य असल्याचं कळलं.” यावर अनुष्का शर्माने सोशल मीडियातून स्पष्टीकरण दिल्यानंतर, इंजिनीअर यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, आपल्या वक्तव्यातून राईचा पर्वत करण्यात आल्याचं म्हणत माफी मागितली आहे. अवश्य वाचा - तुम्ही राईचा पर्वत केलात ! अनुष्का बद्दलच्या वक्तव्याबद्दल फारुख इंजिनीअर यांनी मागितली माफी