नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यादरम्यान पदार्पणातच अर्धशतकी खेळी करणार्‍या प्रतिका रावलच्या मते महिला संघासाठी जास्तीत जास्त कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात यावे. प्रतिकाने या महिन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात ६३ धावांची खेळी केली.

‘‘कसोटी क्रिकेटमधील महत्त्वाचे प्रारूप आहे. लहानपणापासूनच माझे प्रशिक्षक व वडील या प्रारूपात चांगल्या कामगिरीसाठी आग्रही असायचे. त्यामुळे माझे क्रिकेटमधील आवडते प्रारूप आहे. मी विवियन रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि रिकी पॉन्टिंग सारख्या खेळाडूंच्या ध्वनिचित्रफिती पाहिल्या. कसोटी क्रिकेटमधील त्यांच्या खेळाने मला नेहमीच प्रेरणा मिळाली.

महिला क्रिकेटमध्येही जेवढे अधिक कसोटी सामने होतील, तेवढेच चांगले असेल. कसोटी क्रिकेटमधील अनुभव खेळाडूंना अधिक परिपक्व बनवतो,’’ असे प्रतिका म्हणाली. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी प्रतिकाला एका कार्यक्रमादरम्यान ५१ लाख रुपयांच्या पुरस्कारासह सन्मानित केले. तर, विश्वविजेत्या १९ वर्षांखालील पुरुष संघाचा सदस्य उद्धव मोहनला ११ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

गेल्या वर्षी दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर होण्यापूर्वी प्रतिकाने सात सामन्यांतील सहा डावांत एका शतकासह ३०८ धावा केल्या. भारतासाठी २७ एकदिवसीय सामन्यांत दोन शतक व आठ अर्धशतकांच्या मदतीने ११८९ धावा करणार्‍या प्रतिकाने ‘बीसीसीआय’ पुरस्कार सोहळ्याचा अनुभव विशेष असल्याचे सांगितले. तसेच, विश्वचषक जेतेपद कारकीर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिका म्हणाली. ‘‘अजूनही तो क्षण विसरलेली नाही. तो क्षण नेहमीच संस्मरणीय असेल,’’ असे प्रतिकाने सांगितले.

महिला क्रिकेट संघासाठी वर्ष निर्णायक

महिला संघासाठी वर्ष महत्त्वपूर्ण आहे. कारण, संघाला या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. ‘‘माझी योजना ही सोपी असते. माझे लक्ष्य देशासाठी चांगली कामगिरी करण्यासह संघासाठी योगदान देण्याची असते. मी एका वेळेला एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करते,’’ असे प्रतिका म्हणाली.

महिला संघाच्या आगामी मालिका

  • भारत वि. दक्षिण आफ्रिका (पाच ट्वेन्टी-२० सामने) (१७ ते २७ एप्रिल)
  • भारत वि. इंग्लंड (तीन ट्वेन्टी-२० सामने) (२८ मे ते २ जून)