फिफा वर्ल्डकप २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा एक्स्ट्रा टाईममध्ये १-० ने पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले. ६१ व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून आलेल्या २६ वर्षीय फेरान टॉरेसने १०६ व्या मिनिटाला ऐतिहासिक गोल केला आणि स्पेनने विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. फेरॉन टॉरेस काय करू शकतो याची झलक भारतात पाहायला मिळाली होती.
रविवारी झालेल्या वर्ल्डकप फायनल लढतीच्या ९ वर्ष आधी टॉरेस भारतात आला होता. २०१७ मध्ये फिफा U17 वर्ल्डकप भारतात झाला होता. स्पेनच्या संघाचा भाग असलेला तरणाबांड टॉरेस त्यावेळी भारतात आला होता. स्पेनला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. त्यावेळी टॉरेस व्हॅलेन्सिआ अकादमीचा भाग होता. स्पेनच्या संघातल्या आश्वासक खेळाडूंपैकी तो एक होता. राईट विंगर म्हणून खेळलेल्या टॉरेसने २ गोल आणि २ असिस्टसह स्पेनच्या फायनलपर्यंतच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. फायनलमध्ये इंग्लंडने स्पेनला ५-२ असं नमवलं. टॉरेस स्पेनच्या संघाचा भाग होता.
टॉरेस भविष्यात स्पेनच्या राष्ट्रीय संघाचा अविभाज्य भाग होणार याची चुणूक कोचीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम तसंच कोलकाता इथल्या विवेकानंद युवा भारती केंद्र क्रीडांगण इथे अनुभवायला मिळाली होती. ज्युनियर पातळीवर स्वत:ला सिद्ध केल्यानंतर टॉरेसने वरिष्ठ संघासाठी खेळतानाही विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गोल करण्यासाठी अवघड मानलं गेलेल्या फायनलच्या मुकाबल्यात टॉरेसचा एकमेव गोल ओअॅसिस ठरला. या लढतीत खेळलेला एरिक गार्सिया हाही १७ वर्षांखालील वर्ल्डकपसाठी भारतात आलेल्या स्पेन संघाचा भाग होता. २०१० मध्ये आंद्रेस इनिएस्टाने फायनलमध्ये गोल करत स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं. रविवारी रात्री टॉरेसे इनिएस्टाचा कित्ता गिरवला. ८०,००० चाहत्यांच्या साक्षीने खेळण्याचं दडपण न घेता टॉरेसने सर्वांगीण खेळ केला.
फायनलच्या मुकाबल्यात स्पेन आणि अर्जेंटिनाचे खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरत होते. त्यावेळी २६ वर्षीय टॉरेसने दमदार गोल केला आणि सामना स्पेनच्या बाजूने फिरवला. एक्स्ट्रा टाईमच्या १०६ व्या मिनिटाला, फेरान टॉरेसने दमदार किक मारली आणि या सामन्यातील पहिला गोल केला. या संपूर्ण सामन्यातील एकमेव गोल ठरला. मुख्य बाब अशी आहे की, टॉरेसला या सामन्यातील सुरुवातीच्या प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. त्यानंतर सामन्यातील ६१ व्या मिनिटाला त्याला मैदानात उतरण्याची संधी मिळाली. सुरुवातीला हा निर्णय फसला, पण शेवटी त्याने मॅनेजरचा निर्णय योग्य ठरवला आणि स्पेनला दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकून दिला.
टोरेसने फुटबॉलचे बारकावे आजोबांकडून शिकून घेतले. पाळीव कुत्र्याच्या बरोबरीने त्याने सराव केला.
