सा यप्रसच्या नयनरम्य बेटावर सुरू असलेल्या कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत महिलांच्या गटात चुरशीची लढत सुरू आहे. तर आघाडीवर असलेल्या जावोखिर सिंदारोवपेक्षा दीड गुणांनी मागे पडलेल्या फॅबियानो कारुआनाच्या मते पुरुषांचे अजिंक्यपद जवळजवळ उझबेकिस्तानकडे झुकले आहे.
१४ फेर्यांची कँडिडेट्स स्पर्धा २०१३ साली सुरू झाली. त्यानंतरचा इतिहास पाहता, स्पर्धेच्या ७ फेर्यांच्या अखेरीस सिंदारोवचे ६ गुण हे विक्रमच म्हणावे लागतील. विशेष म्हणजे संपूर्ण १४ फेर्यांच्या अखेरीस कोणत्याही विजेत्याला ५ हून अधिक विजय मिळवता आलेले नव्हते. यात मॅग्नस कार्लसन, विश्वनाथन आनंद यांसारख्या महान खेळाडूंचाही समावेश आहे. याउलट, २० वर्षीय सिंदारोवने केवळ ७ फेर्यांतच ५ विजय मिळवले आहेत.
अशा परिस्थितीत मागे पडलेल्या कारुआना, प्रज्ञानंद आणि नाकामुरा यांसारख्या महारथींना माजी जगज्जेता मिखाईल ताल यांची आठवण येत असेल. १९५९ सालच्या कँडिडेट्स स्पर्धेच्या सुरुवातीला ताल यांची सुरुवात अतिशय खराब झाली होती. पहिल्या पाच फेर्यांनंतर त्यांच्याकडे फक्त एक विजय आणि तीन पराभवांसह दीड गुण होते. मात्र त्यांनी हार न मानता जोरदार पुनरागमन केले आणि केवळ कँडिडेट्स जिंकली नाही, तर नंतर मिखाईल बोटविनीक यांचा पराभव करून जगज्जेतेपदही पटकावले. अर्थात, त्यावेळी ही स्पर्धा तब्बल २८ फेर्यांची होती.
प्रज्ञानंदने पहिल्या फेरीत राजासमोरील प्यादे पुढे सरकवत अनिश गिरीसारख्या तयार प्रतिस्पध्र्याला पराभूत केले होते. मात्र त्यानंतरच्या सर्व डावांत त्याने पांढर्या मोहर्यांनी खेळताना वजिराच्या प्याद्याने सुरुवात का केली आणि आपल्या यशस्वी ठरलेल्या ओपनिंगला का नाकारले, हे कोडेच आहे. कारण त्यानंतर त्याला पांढर्या मोहर्यांनी एकही विजय मिळवता आलेला नाही.
कोनेरू हम्पी यांच्या अनुपस्थितीमुळे ॲना मुझिचुक अखेरच्या क्षणी स्पर्धेत दाखल झाली आणि थेट आघाडीवर पोहोचली, असे म्हणावे लागेल. विश्रांतीच्या दिवशी (चौथ्या फेरीनंतर) ती आणि बिबिसारा असाऊबायेवा संयुक्त आघाडीवर होत्या. मात्र, अर्धी स्पर्धा उलटल्यानंतर बिबिसारा शेवटच्या क्रमांकावर घसरली आहे, तर त्यावेळी शेवटी असलेली वैशाली आता मुझिचुकपासून फक्त अध्र्या गुणाने मागे आहे.
पाचव्या फेरीत पराभव पत्करलेली वैशाली जणू जखमी वाघिणीसारखी उसळली आणि सलग दोन विजय मिळवत दुसर्या क्रमांकावर पोहोचली. सातव्या फेरीतील तिचा विजय काहीसा नशिबाने मिळाला असला, तरी तो माजी जगज्जेती चिनी खेळाडू टॅन झोंगयीविरुद्ध होता, हे लक्षात घ्यावे लागेल. दिव्या देशमुखलाही सलग दुसरा विजय मिळवण्याची
संधी होती, पण माजी जलदगती विश्वविजेती कॅटरिना लायनोने तब्बल १३५ चालींचा खंबीर बचाव करत तिला रोखले. एकूणच, प्रज्ञानंदला दोम्माराजू गुकेशचा आव्हानवीर होण्याची शक्यता सध्या धुसर दिसते. मात्र त्याची मोठी बहीण वैशाली हिला जगज्जेतेपदासाठी आव्हान देण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक
