भारताची ग्रँडमास्टर द्रोणावल्ली हरिकाने रशियाच्या एलिना कॅशलिंस्कायाचा पराभव करत ‘फिडे’ ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत नऊ फेऱ्यांअंती अन्य चार खेळाडूंसह संयुक्तरीत्या दुसरे स्थान मिळवले.

हरिकाने सुरुवातीपासून चांगला खेळ करत रशियन प्रतिस्पर्धीवर दडपण टाकले. त्यामुळे कॅशलिंस्कायाने ८३व्या चालीवर हार पत्करली. या विजयामुळे हरिकाचे नऊ फेऱ्यांमध्ये सहा गुण झाले आहेत. सर्वाधिक आठ गुणांसह चीनची खेळाडू ली तिन्गजेई अव्वल स्थानी असून महिलांमध्ये तिचे विजेतेपद जवळपास निश्चित आहे.

खुल्या गटात, भारताच्या के. शशिकिरणने नवव्या फेरीत पावेल एल्यानोव्हला पराभूत केले. त्याच्या खात्यात एकूण सहा गुण झाले असून अन्य नऊ खेळाडूंसह तो संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा युवा ग्रँडमास्टर रौनक साधवानीलाही (एकूण ५ गुण) विजय प्राप्त करण्यात यश आले.