दोहा : भारताचा पारंपरिक प्रारूपातील जगज्जेता दोम्माराजू गुकेश आणि अर्जुन एरिगेसी हे दोघेही भारतीय खेळाडू जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या नऊ फेऱ्यांनंतर चांगली स्थितीत पोहोचले आहेत. हे दोन्ही खेळाडूंचे ६.५ गुण असून ते संयुक्त तिसऱ्या स्थानी आहेत. ग्रँडमास्टर व्लादिस्लाव आर्तेमिएव आणि हान्स निमन हे दोघेही ७.५ गुणांसह अग्रस्थानी आहेत. तर, पाच जेतेपद मिळवणारा मॅग्नस कार्लसनची सात गुणांसह संयुक्त दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
गुकेशने दुसऱ्या दिवशी सहाव्या फेरीत अनिश गिरीविरुद्ध खेळताना ५७व्या चालीनंतर बरोबरीची नोंद केली. यानंतर ॲलेक्से सरानाविरुद्धही त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले. आठव्या फेरीत काळ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या गुकेशने स्पेनच्या डेव्हिड अँटोनविरुद्ध विजय नोंदवला. मात्र, नवव्या फेरीत त्याला उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोवविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या गुकेशने ३४व्या चालीत केलेल्या चुकीचा फटका त्याला बसला.
एरिगेसीला आर्तेमिएवकडून सहाव्या फेरीत पराभूत व्हावे लागले. यानंतर एरिगेसीने माकसिम चिगाएवविरुद्ध बरोबरी नोंदवली. तर, भारताच्या नारायणनविरुद्ध विजय नोंदवला. नवव्या फेरीत ख्रिस्तोबेल हेनरिक्झविरुद्ध एरिगेसीने बरोबरीची नोंद केली. खुल्या विभागातील आता अखेरच्या चार फेऱ्या शिल्लक आहेत. आर्तेमिएवने दिवसातील धक्कादायक निकालाची नोंद करताना कार्लसनला पराभूत केले.
हम्पी संयुक्त अग्रस्थानी महिला विभागात गतविजेती कोनेरू हम्पीने ६.५ गुणांसह चीनच्या झू जिनेरविरुद्ध संयुक्तपणे अग्रस्थानी आहे. हरिका द्रोणावल्ली ही सहा गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहे. तर, विश्वचषक विजेती दिव्या देशमुख ५.५ गुणांसह संयुक्त तिसऱ्या स्थानावर आहे. हम्पीने दुसऱ्या दिवसाच्या चार फेऱ्यांमध्ये तीन विजय व एका बरोबरीची नोंद केली.
