FIFA takes disciplinary action against Argentina players World Cup 2026: फिफा विश्वचषक २०२६ अंतिम सामन्यानंतर अर्जेंटिनाच्या दोन खेळाडूंवर फिफाने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. स्पेनविरुद्धच्या अंतिम सामन्यात मैदानावरील वर्तनामुळे त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. तसेच, इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील विजयानंतर फॉकलंड बेटांशी संबंधित राजकीय संदेश असलेला बॅनर प्रदर्शित केल्याप्रकरणी अर्जेंटिना फुटबॉल महासंघावरही कारवाई करण्यात आली आहे.
फिफाने अर्जेंटिनाविरोधात सुरू केलेल्या शिस्तभंगाच्या प्रकरणांमध्ये चाहत्यांकडून करण्यात आलेले भेदभावपूर्ण घोषणाबाजी आणि हावभाव, अंतिम सामन्यानंतर सहाय्यक प्रशिक्षकाने हल्ला केल्याचा आरोप तसेच विश्वचषकादरम्यान विविध सामन्यांत प्रेक्षकांनी मैदानात वस्तू फेकल्याच्या घटनांचाही समावेश आहे. अंतिम सामन्यानंतर झालेल्या गोंधळात अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिअँड्रो पारेदेस याच्यावर मारहाणीचे तीन आरोप ठेवण्यात आले आहेत. बचावपटू नाहुएल मोलिना याच्यावर दोन आरोप, तर प्रशिक्षक रॉबेर्टो अयाला यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
फिफाचे पारेदेस आणि मोलिनावर फिफाचे गंभीर आरोप
याशिवाय, नाहुएल मोलिना आणि थिएगो अलमाडा याच्यावर खेळाडूवृत्तीला न साजेसं वर्तन (Unsporting Behaviour) केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. स्पेनचा खेळाडू गॅवी याच्यावरही याच प्रकारचा आरोप दाखल करण्यात आला आहे. अंतिम सामन्यानंतर स्पेनचे एरिक गार्सिया आणि गॅवी यांच्यासोबत झालेल्या बाचाबाचीदरम्यान अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिअँड्रो पारेदेसला पंचांनी लाल कार्ड दाखवलं होतं. मात्र, बीबीसीच्या वृत्तानुसार, नंतर फुटबॉलच्या नियामक संस्थेने हे लाल कार्ड रद्द (डिलीट) केलं.
या वादाला नेमकं काय कारण ठरलं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अंतिम शिट्टी वाजल्यानंतर काही क्षणांत एरिक गार्सिया मैदानावर पडल्याचं दिसतं. त्यानंतर तो उठून पारेदेससोबत शाब्दिक वाद घालतो आणि त्यावेळी पारेदेस त्याच्या मानेवर हात ठेवत त्याला मागे ढकलताना दिसतो.
याशिवाय, अर्जेंटिनाचा बचावपटू नाहुएल मोलिना याने विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी धावत असलेल्या स्पेनचा कर्णधार रोड्री याला धक्का देण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. तसेच, अर्जेंटिनाच्या प्रशिक्षक मंडळातील रोबेर्टाे यांनी स्पेनचा खेळाडू डानी ओल्मो याच्या चेहऱ्यावर ठोसा मारण्याचा प्रयत्न केल्याचंही सांगितलं जात आहे. परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.
इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत २-१ असा विजय मिळवल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी “Las Malvinas son Argentinas” (माल्विनास बेटं अर्जेंटिनाची आहेत) असा संदेश असलेला बॅनर प्रदर्शित केला होता. माल्विनास ही बेटं ब्रिटनमध्ये फॉकलंड बेटे म्हणून ओळखली जातात आणि या बेटांवरून अर्जेंटिना व ब्रिटनमध्ये दीर्घकाळापासून सार्वभौमत्वाचा वाद सुरू आहे. या घटनेनंतर ब्रिटन सरकारमधील अधिकाऱ्यांनी फिफाकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर फिफाने अर्जेंटिना फुटबॉल महासंघावर “क्रीडा स्पर्धेचा गैरक्रीडा स्वरूपाच्या आंदोलनासाठी किंवा प्रात्यक्षिकासाठी वापर केल्याचा” औपचारिक आरोप ठेवला.
फिफाने स्पष्ट केलं की, ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर फिफाची शिस्तपालन समिती (Disciplinary Committee) योग्य वेळी अंतिम निर्णय जाहीर करेल.
