FIFA World Cup 2026: इंग्लंड संघाने नॉर्वेचा पराभव करत फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. इंग्लंडने अतिरिक्त वेळेत (एक्स्ट्रा टाइम) नॉर्वेवर २-१ असा थरारक विजय नोंदवला. मात्र, सामन्यानंतर पुन्हा एकदा पंचांच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आणि त्याचीच सर्वाधिक चर्चा रंगली. इंग्लंड संघाच्या वादग्रस्त गोलची का चर्चा आहे, जाणून घेऊया.

वादाची ठिणगी पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत ज्युड बेलिंगहॅमच्या बरोबरीच्या गोलच्या काही क्षणांपूर्वी पडली. नॉर्वेचा गोलरक्षक ऑर्जान नायलँडने मारलेली लांब गोल किक हवेत असतानाच अचानक दिशाबदल झाल्याचं दिसलं. त्यामुळे चेंडू मैदानाच्या वर लावलेल्या कॅमेरा केबलला लागला होता का, असा प्रश्न उपस्थित करत अनेकांनी पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला.

या घटनेनंतर नॉर्वेच्या खेळाडूंनी तात्काळ फ्रेंच पंच क्लेमेंट टर्पिन यांच्याकडे आक्षेप नोंदवला. इंग्लंडने पुन्हा चेंडूवर ताबा मिळवण्यापूर्वी गोलरक्षक ऑर्जान नायलँडची गोल किक मैदानावरील कॅमेरा केबलला लागली होती, असा त्यांचा दावा होता. त्यानंतर इंग्लंडने चेंडू ज्युड बेलिंगहॅमपर्यंत पोहोचवला आणि त्याने बरोबरीचा गोल केला. यानंतर अतिरिक्त वेळेत बेलिंगहॅमने आणखी एक गोल करत इंग्लंडला दमदार पुनरागमन करून दिलं. या विजयासह प्रशिक्षक थॉमस टुचेल यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं.

दरम्यान, या वादावर फिफाने स्पष्टीकरण दिलं आहे. ‘कनेक्टेड बॉल टेक्नॉलॉजी’च्या नोंदीनुसार चेंडूचा मैदानावरील कॅमेरा केबलशी कोणताही संपर्क झाला नव्हता, त्यामुळे पंचांचा निर्णय योग्य असल्याचं फिफाने स्पष्ट केलं. फुटबॉलच्या नियमांनुसार, खेळ सुरू असताना चेंडूचा मैदानावरील कॅमेरा केबलसारख्या बाह्य वस्तूशी संपर्क झाल्यास खेळ तात्काळ थांबवावा लागतो. त्यानंतर ‘ड्रॉप्ड बॉल’द्वारे पुन्हा खेळ सुरू केला जातो. मात्र, पंचांना चेंडू केबलला लागल्याचं आढळलं नसल्याने त्यांनी खेळ सुरूच ठेवला.

फिफाच्या स्पष्टीकरणानंतर, ‘कनेक्टेड बॉल टेक्नॉलॉजी’ने नोंदवलेल्या माहितीच्या आधारे पंचांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं स्पष्ट झालं. तर टीव्हीवरील रिप्लेमध्ये चेंडूच्या दिशेत किंचित बदल झाल्यासारखा भासत असला, तरी उपलब्ध तांत्रिक डेटामध्ये चेंडू केबलला लागल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही.

या घटनेनंतर नॉर्वेच्या संघात प्रचंड संतापाचं वातावरण निर्माण झालं. इंग्लंडने गोल केल्यानंतर गोलरक्षक ऑर्जान नायलँडने संतापाच्या भरात मैदानावर हात आपटला. तर, स्ट्रायकर एर्लिंग हालांड आणि मुख्य प्रशिक्षक स्टोले सोलबाकेन यांनी मध्यंतराच्या वेळी ड्रेसिंग रूमकडे जाताना पंच क्लेमेंट टर्पिन यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

यानंतरही नॉर्वेची निराशा कमी झाली नाही. सामन्यादरम्यान मार्टिन ओडेगार्डच्या कॉर्नरवर लिओ हेगेमने चेंडू जाळ्यात धाडत बरोबरीचा गोल केल्याचं वाटलं. मात्र, व्हीएआर (VAR) अधिकारी जेरोम ब्रिसार्ड यांनी पंचांना प्रसंग पुन्हा पाहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर टर्पिन यांनी हालांडने कॉर्नर घेण्यापूर्वी इलियट अँडरसनवर फाऊल केल्याचा निर्णय देत नॉर्वेचा गोल रद्द केला.

केबल प्रकरणाप्रमाणे या वेळी मात्र पंचांनी मैदानावरील व्हिडीओ पुनरावलोकन (ऑन-फिल्ड रिव्ह्यू) केल्यानंतरच निर्णय दिला आणि तो स्टेडियममधील प्रेक्षकांनाही अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. तरीही, सामन्यातील महत्त्वाच्या प्रत्येक क्षणी निर्णय आपल्या विरोधातच जात असल्याची भावना नॉर्वेच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये अधिक तीव्र झाली.