जिनेव्हा : कतारमध्ये ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला एक दिवस आधी प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यजमान कतार विरुद्ध इक्वेडर यांच्यातील सलामीचा सामना २० नोव्हेंबरला होऊ शकेल.

विश्वचषक स्पर्धेला आधीच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार २१ नोव्हेंबरला, सोमवारी सुरुवात होणार होती. दोहा येथे नेदरलँड्स आणि सेनेगल यांच्यात पहिला सामना, तर इंग्लंड-इराण यांच्यात दुसरा सामना होणार होता. अ-गटातील कतार-इक्वेडर यांच्यातील सामना त्याच दिवशी सहा तासांनी होणार होता. त्यामुळे स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा तिसऱ्या सामन्यापर्यंत लांबतो आहे. हा सामना होत असलेल्या अल बेट स्टेडियमची प्रेक्षकसंख्या ६० हजारांइतकी आहे. दोहा येथे १ एप्रिलला निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकात २८ दिवसांचे नियोजन करण्यात आले. परंतु ताज्या योजनेत २९ दिवसांचा समावेश करण्यात आला आहे.

युरोपमधील लीग स्पर्धा १३ नोव्हेंबर पर्यंत चालत असल्यामुळे ‘फिफा’ने २८ दिवसांच्या कार्यक्रमाला मान्यता दिली होती. कतार आणि इक्वेडोरमधील खूप कमी खेळाडू युरोपमध्ये खेळत असल्यामुळे यजमान कतारला उद्घाटनाचा सामना खेळण्याची संधी मिळेल.

विश्वचषकाची तिकिट विक्री यापूर्वीच झाली आहे. आता या बदलामुळे फुटबॉल रसिकांनाही प्रवासाचा कार्यक्रम बदलावा लागू शकेल. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद कतारला देण्याचा निर्णय २०१०मध्ये घेण्यात आल्यानंतर चार वर्षांनी ‘फिफा’ने स्पर्धेच्या तारखेत प्रथमच बदल केला होता. आता सात वर्षांनी पुन्हा एकदा स्पर्धेच्या तारखांमध्ये बदल करण्याची स्थिती उद्भवली आहे.