FIFA World Cup 2026 Final Argentina vs Spain Brawl: फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यानंतर अर्जेंटिनाच्या काही खेळाडूंच्या वर्तनाची फिफा चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्पेनकडून १-० अशा फरकाने पराभूत झाल्यानंतर अंतिम शिट्टी वाजताच अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिएँद्रो पारेदेस याचा स्पेनच्या एरिक गार्सिया आणि गावीसह काही खेळाडूंशी वाद झाला. स्काय स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, हिंसक वर्तन केल्याप्रकरणी पारेदेसला रेड कार्डही दाखवण्यात आलं.
या वादाला नेमकं काय कारण ठरलं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अंतिम शिट्टी वाजल्यानंतर एरिक गार्सिया मैदानावर पडल्याचं दिसतं. त्यानंतर तो उठून पारेदेसशी शाब्दिक वाद घालतो. या वादादरम्यान पारेदेसने गार्सियाच्या मानेजवळ हात ठेवत त्याला जोरात ढकलल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
याशिवाय, अर्जेंटिनाचा बचावपटू नाहुएल मोलिना याने विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी धावत असलेल्या स्पेनचा कर्णधार रोद्री याला पाडण्याचा प्रयत्न केल्याचंही वृत्त आहे. इतकंच नव्हे, तर अर्जेंटिनाचे सहाय्यक प्रशिक्षक रोबर्टो आयाला यांनी स्पेनचा खेळाडू दानी ओल्मो याच्या चेहऱ्यावर ठोसा मारण्याचाही प्रयत्न केल्याचं काही व्हिडिओंमध्ये दिसून आलं आहे. या सर्व प्रकाराची फिफाकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
सामन्यात बदली खेळाडू म्हणून आलेल्या फेरान टोरेस याने अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच निर्णायक गोल करत स्पेनला १-० असा विजय मिळवून दिला. या विजयासह स्पेनने दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. अंतिम सामना बराचसा संथ आणि चुरशीचा झाला. अर्जेंटिनाने कडवी झुंज दिली, मात्र आक्रमणात त्यांना अपेक्षित धार दाखवता आली नाही.
संपूर्ण सामन्यात युरोपियन चॅम्पियन स्पेनने वर्चस्व राखलं. मात्र, अनेक संधी निर्माण करूनही त्यांना गोल करता आला नव्हता. अखेर अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या सत्राला अवघे ३७ सेकंद झाले असताना पेद्रो पोरो याने उजव्या बाजूने केलेल्या अचूक क्रॉसवर निको विल्यम्सने हेडरद्वारे चेंडू फेरान टोरेसच्या दिशेने वळवला. त्यानंतर टोरेसने कोणतीही चूक न करता जोरदार फटका मारत चेंडू थेट जाळ्यात धाडला आणि स्पेनच्या ऐतिहासिक विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं.
सामन्याच्या नियोजित ९० मिनिटांच्या अखेरीस एन्झो फर्नांडेझला दुसरं पिवळं कार्ड मिळाल्याने अर्जेंटिनाला १० खेळाडूंनी उर्वरित सामना खेळावा लागला. १९६२ मध्ये ब्राझीलनंतर सलग दोन विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनण्याची अर्जेंटिनाला संधी होती. मात्र, अतिरिक्त वेळ सुरू होईपर्यंत त्यांना स्पेनच्या गोलपोस्टच्या दिशेने एकही शॉट मारता आला नव्हता.
विजेतेपद हातातून निसटत असल्याचं लक्षात आल्यानंतर अर्जेंटिनाने अखेरच्या काही मिनिटांत आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यामुळे ३९ वर्षीय कर्णधार लिओनेल मेस्सीला आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या विश्वचषक अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. अंतिम शिट्टी वाजताच स्पेनच्या राखीव खेळाडूंनी मैदानात धावत येत जल्लोषाला सुरुवात केली. २०१० नंतर दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद जिंकल्याचा आनंद साजरा करत असतानाच मैदानावर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये धक्काबुक्की आणि वादावादी झाली. त्यामुळे विजयानंतरचा जल्लोष काही काळ गोंधळात बदलल्याचं पाहायला मिळालं.
