डीआर काँगोचे मुख्य प्रशिक्षक सेबॅस्टियन देसाब्रे यांचा फिफा विश्वचषकातील ऐतिहासिक प्रवास अत्यंत दुःखद वळणावर संपला. इंग्लंडविरुद्धच्या राऊंड ऑफ ३२ सामन्यात १-२ असा पराभव झाल्यानंतर पत्रकार परिषदेदरम्यान त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी जाहीर करण्यात आली. ही माहिती ऐकताच काही क्षण देसाब्रे पूर्णपणे हादरून गेले.
१९७४ नंतर प्रथमच डीआर काँगोला विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यात देसाब्रे यांनी मोलाची भूमिका बजावली होती. पोर्तुगाल आणि कोलंबियासारख्या बलाढ्य संघांचा समावेश असलेल्या कठीण के गटामधून त्यांनी संघाला बाद फेरीत पोहोचवलं. इंग्लंडविरुद्ध ब्रायन सिपेंगाने सातव्या मिनिटालाच गोल करत डीआर काँगोला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, उत्तरार्धात हॅरी केनने केलेल्या दोन गोल्सच्या बळावर इंग्लंडने पुनरागमन करत सामना २-१ असा जिंकला.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत देसाब्रे पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तर देत असताना, शेवटी माध्यम अधिकाऱ्याने हस्तक्षेप करत त्यांच्या वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी उपस्थितांना सांगितली. ही माहिती ऐकताच देसाब्रे काही क्षणांसाठी स्तब्ध झाले. पत्रकार परिषदेच्या शेवटी माध्यम अधिकाऱ्याने फ्रेंच भाषेत घोषणा करत म्हटलं, “धन्यवाद. मात्र, आम्हाला एक दुःखद बातमी सांगायची आहे. प्रशिक्षकांच्या वडिलांचं निधन झालं आहे.” त्यानंतर पत्रकार परिषद संपवण्यात आली.
देसाब्रे यांना त्यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती नेमकी कधी मिळाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, माध्यम अधिकाऱ्याकडून ही घोषणा होताच ४९ वर्षीय प्रशिक्षक काही क्षणांसाठी पूर्णपणे हादरलेले दिसले. गेली चार वर्षे डीआर काँगोच्या संघाची धुरा सांभाळणाऱ्या या फ्रेंच प्रशिक्षकाने केवळ “मेर्सी” (धन्यवाद) एवढंच म्हणत शांतपणे पत्रकार परिषदेतून बाहेर पडणं पसंत केलं.
स्वत:वर दुःखाचा डोंगर कोसळूनही देसाब्रे यांनी विश्वचषकातील डीआर काँगोच्या प्रेरणादायी कामगिरीचा अभिमान व्यक्त केला. ते म्हणाले, “आम्ही निराशेपेक्षा अधिक अभिमानाने इथून जात आहोत. विश्वचषकातून बाहेर पडल्याचं दुःख नक्कीच आहे. पण या स्पर्धेत आम्ही पाच गोल केले, जगातील अव्वल क्रमांकाच्या संघांविरुद्ध चांगली लढत दिली आणि उल्लेखनीय निकाल मिळवले.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही इंग्लंडला खऱ्या अर्थाने अडचणीत आणलं होतं. मात्र, मोठ्या संघांचं वैशिष्ट्य म्हणजे ते अशा परिस्थितीतून सावरतात. जगातील सर्वोत्तम स्ट्रायकर हॅरी केनला त्यांना वाचवावं लागलं. बलाढ्य संघांविरुद्ध असंच घडतं. आम्ही आमच्याकडून सर्वोत्तम प्रयत्न केले. विजयाच्या अगदी जवळ पोहोचलो होतो आणि आमच्यासाठी ही कामगिरी एका अर्थाने विजयासारखीच आहे.”
