अद्भुत खेळाच्या जोरावर खेळाडू आपल्या संघाला यश मिळवून देतात. वाढत्या यशाबरोबर खेळाडूंचा ब्रँड तयार होतो. आख्यायिकांच्या सदरात जाणाऱ्यांमध्ये सचिन तेंडुलकर हे नाव क्रिकेटपटूंना ओळखीचे. फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनेही आता या मांदियाळीत स्थान मिळवले असून, लवकरच ‘कलेक्टाबिलिआ’ या भारतीय कंपनीद्वारे मेस्सीची छबी असलेले मोबाइल, टॅब आणि लॅपटॉप आवरणे बाजारात दाखल होणार आहेत.
ब्राझीलमध्ये होत असलेल्या फुटबॉलच्या महाकुंभमेळ्यादरम्यान अर्जेटिनाच्या लिओनेल मेस्सीवर साऱ्यांच्या नजरा आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून मेस्सी ब्रँड विपणनाच्या सर्वोत्तम संधीचे उत्पादनकर्त्यांनी सोने करायचे ठरवले आहे.
‘कलेक्टाबिलिआ’ संस्थेने मेस्सीची छबी असलेले उत्पादन निर्मितीसाठी जागतिक दर्जाचे विशेष हक्क मिळवले. मेस्सीची स्वाक्षरी असलेले मोबाइल फोन, लॅपटॉप यांच्या विपणनासाठी कलेक्टाबिलिआ संस्थेने इकाय या कंपनीशी करार केला आहे.
‘‘जागतिक दर्जाच्या खेळाडूशी संलग्न होत त्यानुसार खास उत्पादने तयार करण्याची संधी आम्हाला मिळाली याचा अत्यंत आनंद होत आहे. लिओनेल मेस्सीने यासंदर्भात आमच्यावर विश्वास दाखवला आहे, जेणेकरून ब्रँड मेस्सी आणखी विकसित होईल. जगभरातले मेस्सीचे चाहते या संधीचा फायदा घेतील,’’ असा विश्वास ‘कलेक्टाबिलिआ’च्या व्यवस्थापकीय संपादक अंजना रेड्डी यांनी व्यक्त केला.
‘‘माझे छायाचित्र असलेले मोबाइल आणि लॅपटॉप कव्हर अंजनाने मला सादर केले, तेव्हा ते मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबियांना दिले. त्या सगळ्यांना हे खुपच आवडले. जगभरातल्या चाहत्यांनाही हे नक्कीच आवडेल,’’ असे मेस्सीने सांगितले.
यापूर्वीही अव्वल खेळाडूंचा ब्रँड निर्माण करण्यात ‘कलेक्टाबिलिआ’ने निर्णायक भूमिका बजावली आहे. सचिन तेंडुलकरच्या २००व्या कसोटीच्या वेळी सचिनचे छायाचित्र असलेले मोबाइल फोन आवरण तयार करण्यात आले होते.