तिखट मिरचीसारखा चिली हा संघ फुटबॉल विश्वचषकामध्ये प्रतिस्पध्र्याच्या तोंडचे पाणी पळवत आला आहे. विश्वचषकाचा टिळा लावण्यात धन्यता मानणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी यंदाच्या स्पर्धेत चिलीचा पहिला सामना असून त्यांच्यासाठी हा पेपर सोपा असेल. त्यामुळे विजयी सलामी देऊन बाद फेरीच्या दिशेने कूच करण्यासाठी चिलीचा संघ आतूर असेल.
हे दोन्ही संघ १९७४ साली एकमेकांसमोर उभे ठाकले होते, पण त्या वेळी सामना गोलरहित बरोबरीत सुटला होता. चिलीचा संघ १४व्या स्थानावर असून ऑस्ट्रेलियाचा संघ ६२व्या स्थानावर आहे. आतापर्यंत या दोन्ही देशांमध्ये एकूण चार सामने झाले असून त्यापैकी तीन चिलीने जिंकले आहेत, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.
दुखापतीमुळे चिलीचा नावाजलेला फुटबॉलपटू आर्टुरो विडालच्या खेळण्याविषयी साशंका व्यक्त होत आहे. त्याच्या अनुपस्थितीत अलेक्सिस सांचेझवर त्यांची मदार असेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये टिम काहिलसारखा नावाजलेला खेळाडू आहे व त्याच्यावर संघाची भिस्त असेल. दोन्ही संघाचा फॉर्म आणि आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर ऑस्ट्रेलियापेक्षा चिलीचे पारडे नक्कीच जड आहे.
स्पेन, चिलीकडे लक्ष
फिफा फूटबॉल विश्वचषकाचा फिव्हर आता सट्टेबाजारात चांगलाच भिनलाय. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री वा पहाटे होणाऱ्या सामन्यांतील रंगत चाखण्यासाठी सट्टेबाज आणि पंटर्स सज्ज झाले आहेत. शनिवारी होणाऱ्या तीन सामन्यांमध्ये फुटबॉलप्रेमींप्रमाणेच सट्टेबाजांचे लक्षही स्पेन, चिलीकडे आहे. अर्थातच शनिवारच्या सामन्यांत सट्टेबाजांनी स्पेन, चिलीसह मेक्सिकोला पसंती दिली आहे, तरीही काही फुटबॉलवेडय़ा पंटर्सनी विचित्र पद्धतीनेही सट्टा खेळत कॅमेरून, नेदरलँड्सला झुकते माप देण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिक क्रमवारीत अद्यापही ब्राझीलला पसंती असली तरी अर्जेंटिनाने तगडे आव्हान उभे केले आहे. सट्टेबाजांच्या म्हणण्यानुसार, विश्वचषक यंदा अर्जेंटिना पटकावेल, असे त्यांना वाटत आहे. अर्जेंटिनाच्या बाजूने चांगलाच सट्टा लावला जात आहे. शनिवारच्या सामन्यात कोण किती गोलने जिंकेल वा सामना अनिर्णित होईल का, या दिशेनेही सट्टा खेळला जात आहे. मात्र ‘गोल्डन बूट’ यंदा कोण जिंकणार यासाठीही जोरात रस्सीखेच सुरू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अद्यापही ब्राझीललाच सट्टेबाजांनी पसंती दिली आहे.
आजचा भाव :
    १. मेक्सिको :    कॅमेरून:
     ७० पैसे (११/१०);    अडीच रुपये (१३/५).
    २. स्पेन:    नेदरलँड :
     ६० पैसे (१७/२०);    तीन रुपये (७/२).
    ३. चिली :    ऑस्ट्रेलिया :
     ५० पैसे (१/२);    चार रुपये (१३/२).
(कंसात आंतरराष्ट्रीय बेटिंग वेबसाइटवरील सरासरी)
– निषाद अंधेरीवाला