ग्रीसला सामाजिक आणि कलेची मोठी संस्कृती आहे. मात्र त्यांच्या देशातल्या फुटबॉलला मोठा वारसा नाही. त्यांचे खेळाडू युरोपातल्या क्लब स्पर्धामध्ये खेळतात. मात्र तरीही हा संघ सर्वसाधारण संघ म्हणून ओळखला जातो. मात्र महत्त्वाकांक्षा असेल तर इतिहास बदलता येतो, हे ग्रीसच्या उदाहरणाने स्पष्ट झाले आहे. ग्रीसने आयव्हरी कोस्टवर मात करत बाद फेरी गाठण्याची किमया साधली. ग्रीसच्या तिन्ही लढतींचे विश्लेषण केले तर त्यात चकित करणारे काहीच नाही. वैयक्तिक अपवादात्मक प्रदर्शनाची नोंद नाही. नियमांना चिकटून मूलभूत कौशल्यांवर भर देणारा खेळ, हीच त्यांची खासियत म्हणायला हवी. चांगल्या किंवा वाईट कोणत्याच कारणांसाठी त्यांचे खेळाडू चर्चेत नसतात. आंद्रेस सॅमरस हा त्यांचा प्रसिद्ध म्हणता येईल असा खेळाडू. अशी सामान्य पाश्र्वभूमी असणाऱ्या ग्रीसने आयव्हरी कोस्टसारख्या दमदार संघाला नमवत बाद फेरी गाठणे प्रशंसनीय म्हणावे लागेल. याया टौरू, गेरविन्हो, दिदियर ड्रोग्बा अशा तगडय़ा खेळाडूंचा समावेश असलेल्या आयव्हरी कोस्टला ग्रीसने कडवी टक्कर दिली. निर्णायक क्षणी मिळालेल्या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात त्यांनी यश मिळवले. हे निश्चितच स्पृहणीय आहे. गटवार लढतीत त्यांनी कोलंबिया, आयव्हरी कोस्ट आणि जपानचा सामना केला. मात्र बाद फेरीत त्यांच्यासमोर मोठय़ा संघांचे आव्हान उभे राहणार आहे. एकहाती सामना फिरवू शकेल असा खेळाडू त्यांच्याकडे नाही. या गोष्टीचा त्यांना फटका बसू शकतो. मात्र छोटय़ा छोटय़ा गोष्टी अचूकतेने करण्यावर त्यांचा भर असल्याने ते आश्चर्यकारक निकालही नोंदवू शकतात.
अन्य लढतींमध्ये कोलंबियाच्या वाटचालीचा उल्लेख करावा लागेल. कोलंबियाच्या खेळाडूंकडे तांत्रिक कौशल्य नाही. त्यांच्या खेळामध्ये काही त्रुटीही जाणवतात. मात्र त्यांचे गोल करण्यातले सातत्य वाखाणण्याजोगे आहे. प्रत्येक सामन्यात त्यांच्या खेळाडूंनी गोल केले आहेत. विश्वचषकाचा इतिहास पाहिला तर अनेक संघांना बरीच वर्षे गोलविरहित जातात. मात्र कोलंबियाने याबाबतीत सगळ्यांना पिछाडीवर टाकले आहे. जेम्स रॉड्रिग्स हा त्यांचा युवा खेळाडू चमकताना दिसतो आहे. युवा जेम्स पहिल्यांदाच विश्वचषकात खेळतो आहे. विश्वचषकाचे सामने अनेक क्लब्सचे व्यवस्थापक पाहत असतात. जागतिक स्तरावरचे युवा कौशल्य टिपण्याची ही नामी संधी असते. अशा व्यासपीठावर आपले कर्तृत्व सिद्ध करून मोठा व्यावसायिक करार पदरात पाडण्याची संधी जेम्सकडे आहे. आणि तो या संधीचे सोने करताना दिसत आहे. पुढच्या विश्वचषकापर्यंत बरेच काही बदलू शकते. त्यामुळे आता मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेत संघाच्या विजयात योगदान देण्याचा जेम्सचा प्रयत्न आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोलंबियाच्या संघाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. प्रत्येक सामन्याला चाहत्यांचा महासागर जमलेला असतो. खेळ थोडाही मंदावला की ते कोलंबियाच्या खेळाडूंना प्रोत्साहन देतात. असा पाठिंबा असेल तर खेळायला हुरूप येतो आणि हेच कोलंबियाच्या बाबतीत घडते आहे.