प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी फॅशनचे वेड असतेच. कुणाला कपडय़ांची फॅशन आवडते, तर कुणाला केसांची, पण सध्याच्या घडीला सर्वात लोकप्रिय फॅशन आहे ती टॅटूची. फॅशन ही सेलिब्रेटींपासून होते आणि त्यांच्यावर प्रेम करणारे चाहते मग त्यांच्यासारखी नक्कल करतात. बॉलीवूड, हॉलीवूड यांच्यापाठोपाठ फुटबॉलपटूंचा चाहता वर्गही फार मोठा आहे आणि त्यांनी काढलेले टॅटू किंवा त्यांच्या चेहऱ्याचे टॅटू चाहते गोंदवून घेताना आपण पाहतो. अगदी फुटबॉलमधील पितृतुल्य व्यक्तिमत्त्व दिएगो मॅरेडोना ते सध्याच्या नेयमापर्यंत अनेक फुटबॉलपटूंना टॅटूचा मोह आवरता आला नाही. बऱ्याच फुटबॉलपटूंनी टॅटू गोंदवलेले असले, तरी पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने यावेळी एकही टॅटू गोंदवलेला नाही आणि त्याला ही सूचना बेकहॅमने केली आहे. टॅटू गोंदवण्याचा प्रत्येकाचा उद्देश वेगळा असेलही, पण विश्वचषक सुरू असताना खेळाडूंच्या टॅटूना मात्र उधाण आलेले आहे.
फर्नाडो टोरेस :
स्पेनच्या या आक्रमणपटूने आपल्या अंगावर वेगवेगळे टॅटू गोंदवलेले आहेत. आपल्या उजव्या पायावर त्याने रोमन अंकामध्ये ७-७-२००१ ही तारीख गोंदवली आहे. या दिवसाचे महत्त्व म्हणजे तो या दिवशी त्याच्या लहानपणापासूनच्या मैत्रिणीबरोबर ‘डेटिंग’वर गेला होता. त्याचबरोबर उजव्या हातावर त्याने आपला जर्सीचा ९ क्रमांक गोंदवून घेतला आहे. त्याचबरोबर या हातावर त्याने दोन्ही मुलांची नावेही गोंदवली आहेत.
मारिओ बालोटेली :
प्रीमिअर लीगमध्ये पहिला गोल केल्यावर मारिओ बालोटेलीने आपल्या छातीवर ‘आय एम पनिशमेंट ऑफ गॉड’ असे वाक्य गोंदवून घेतले आहे. त्याचबरोबर त्याने सिंहाचे चित्रही गोंदवले होते. उजव्या हातावर त्याने आपली स्वाक्षरी गोंदवून घेतली आहे.
दिएगो मॅरेडोना :
अर्जेटिनाला एकहाती विजय मिळवून देणारे दिएगो मॅरोडोना यांनीही आपल्या अंगावर बरेच टॅटू गोंदवले होते, पण त्यांनी आपल्या पायावर फिडेल कॅस्ट्रो यांचा टॅटू गोंदवला होता आणि त्याचा फटकाही त्यांना बसला. या टॅटूमुळे त्यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला होता. त्यावेळी कम्युनिझमवरील त्यांची असलेली श्रद्धा अमेरिकेच्या पचनी पडली नव्हती.
डेव्हिड बेकहम :
फुटबॉल चाहत्यांना टॅटूचे खऱ्या अर्थाने वेड लावले ते इंग्लंडच्या डेव्हिड बेकहमने. डेव्हिडने आपल्या शरीरावर जवळपास ३२ टॅटू गोंदवले होते. यामध्ये त्याने आपल्या परिवारातील सर्वाची नावे गोंदवून घेतली होती. पत्नी व्हिक्टोरियाच्या नावाचा टॅटू तर त्याने देवनागरी लिपीमध्ये गोंदवून घेतला होता.
नेयमार :
ब्राझीलचा अव्वल फुटबॉलपटू नेयमारनेही आपल्या अंगावर बरेच टॅटू गोंदवले असून, त्याने ते आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना समर्पित केले आहेत. त्याने बहीण राफेला आणि मुलगा डेव्ही लुका यांची नावे आपल्या दंडावर गोंदवून घेतली आहेत. मनगटावर त्याने आईचे नाव गोंदवले आहे. त्याचबरोबर पायाच्या दोन्ही घोटय़ांवर त्याने विविध नावं कोरलेली आहेत.
वेन रूनी :
इंग्लंडचा आघाडीचा फुटबॉलपटू वेन रूनीलाही टॅटूचे वेड असून, त्याच्यावर याबाबतीत टीकाही झाली आहे. २००८मध्ये त्याने हातावर ‘जस्ट इनफ एज्युकेशन टू परफॉर्म’ हे वाक्य गोंदवून घेतले होते. त्यावेळी त्याच्यावर काही प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर उजव्या हातावर त्याने क्रॉस गोंदवलेला होता. डाव्या हाताच्या दंडावर त्याने इंग्लंडचा झेंडा गोंदवला होता.
सर्गियो रामोस :
स्पेनचा सर्गियो रामोस हाही टॅटूचा वेडा. त्याने अंगावर ११ मोठे टॅटू काढले आहेत. उजव्या हाताच्या मधल्या बोटावरही त्याचा टॅटू आहे. १५व्या वर्षी त्याने पहिल्यांदा आपल्या अंगावर टॅटू गोंदवून घेतला होता. अंगावर आपल्या पालकांच्या नावाचे वेगवेगळ्या भाषांमधले टॅटू त्याने गोंदवले आहेत. त्याने आपल्या उजव्या पायावर विश्वचषक आणि डाव्या पायावर युरो चषकाचा टॅटू गोंदवला आहे.
लिओनेल मेस्सी :
अर्जेटिनाचा सध्याचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी शांत वाटत असला, तरी त्यालाही टॅटूचा मोह आवरता आलेला नाही. त्याने आपल्या पायावर मुलाच्या नावाचा (थिआगो) टॅटू गोंदवून घेतला आहे, तर त्याने आपल्या डाव्या खांद्यावर आपल्या आईचा चेहरा गोंदवून घेतला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jun 2014 रोजी प्रकाशित
माझी टॅटूगिरी!
प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी फॅशनचे वेड असतेच. कुणाला कपडय़ांची फॅशन आवडते, तर कुणाला केसांची, पण सध्याच्या घडीला सर्वात लोकप्रिय फॅशन आहे ती टॅटूची.
Written by admin
First published on: 22-06-2014 at 06:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2014 players with tattoos