फिफा विश्वचषक स्पर्धा नुकतीच संपली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियावर ४-२ असा विजय मिळवून २० वर्षानंतर जगज्जेतेपदाचा बहुमान पटकावला. फ्रान्सने पूर्वार्धात २ आणि उत्तरार्धात २ असे एकूण ४ गोल केले. तर क्रोएशियाने पूर्वार्ध आणि उत्तरार्धात प्रत्येकी १-१ गोल केला. विशेष म्हणजे सामन्यात चेंडूचा ६१ टक्के ताबा क्रोएशियाकडे असूनही त्यांना हार पत्करावी लागली.

त्या आधी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हिरो ठरलेल्या फ्रान्सचा बचावपटू उमटिटी याने एक फोटो ट्विटर वर पोस्ट केला आहे. या फोटोत तो विश्वचषकाच्या ट्रॉफीसह शॉवरखाली आंघोळ करत असल्याचे दिसत आहे. या बरोबरच त्याने ‘सर्वात सुंदर गोष्टीबरोबर मी आंघोळ करत आहे’, असे कॅप्शन लिहिले आहे.

उपांत्य फेरीत फ्रान्सची झुंज बेल्जीयमशी झाली. या सामन्यात फ्रान्सचा बचावपटू उमटिटी याने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर फ्रान्सने सामना जिंकला होता. या गोलमुळे फ्रान्सला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारणे शक्य झाले होते. या विजयामुळे तिसऱ्यांदा फ्रान्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.