fifa world cup 2022 argentina vs poland argentina beat poland zws 70 | Loksatta

FIFA World Cup 2022 : अर्जेटिनाची पोलंडवर मात; दोन्ही संघ बाद फेरीत

या सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे बाद फेरीतील स्थान निश्चित नव्हते. त्यामुळे या सामन्यात त्यांनी सर्वोत्तम खेळ करणे गरजेचे होते

FIFA World Cup 2022 : अर्जेटिनाची पोलंडवर मात; दोन्ही संघ बाद फेरीत
पोलंडच्या संघाला तब्बल ३६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची बाद फेरी गाठण्यात यश आले

दोहा :लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिनाने अत्यंत प्रभावाशाली खेळ करत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अखेरच्या गट साखळी सामन्यात पोलंडवर २-० अशी मात केली. या विजयामुळे अर्जेटिनाने क-गटातून अव्वल स्थानासह बाद फेरी गाठली, तर पोलंडला पराभवानंतरही मेक्सिकोपेक्षा सरस गोलफरकामुळे बाद फेरीत आगेकूच करण्यात यश आले.    

या सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे बाद फेरीतील स्थान निश्चित नव्हते. त्यामुळे या सामन्यात त्यांनी सर्वोत्तम खेळ करणे गरजेचे होते. अर्जेटिनाची भिस्त मेसी, तर पोलंडची भिस्त रॉबर्ट लेवांडोवस्की या तारांकित आघाडीपटूंवर होती. या दोघांनाही या सामन्यात गोल मारता आला नाही. मेसीने पूर्वार्धात पेनल्टीची संधीही वाया घालवली. त्यानंतरही अर्जेटिनाने सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले.

अर्जेटिनाकडून ४६व्या मिनिटाला मध्यरक्षक अ‍ॅलेक्सिस मॅक अ‍ॅलिस्टर, तर ६७व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझ यांनी गोल केले. या दोघांचेही विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील हे पहिलेच गोल ठरले. 

क-गटातील हा सामना विलक्षण ठरला. अर्जेटिनाने सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून आक्रमक आणि सफाईदार खेळ केलाच, शिवाय त्यांच्या खेळात कमालीचा वेग होता. त्यांनी चेंडूवर नियंत्रण ठेवले. संपूर्ण सामन्यात अभावानेच अर्जेटिनाच्या कक्षात खेळ झाला. पोलंडला गोल करण्यापेक्षा, अर्जेटिनाला गोल न देण्यावर लक्ष केंद्रित करावे लागले. अर्जेटिनाच्या संघाने या सामन्यात तब्बल २३ फटके गोलच्या दिशेने मारले.

अर्जेटिनाच्या अ‍ॅन्जेल डी मारिया, मेसी, अकुन्या, अल्वारेझ यांनी केलेल्या आक्रमणांमुळे पोलंडचे पूर्ण नियोजन गडबडून गेले. मेसीला पेनल्टीवर गोल करण्यात अपयश आले. अशा पार्श्वभूमीवर पहिल्या सत्राचा खेळ संपला. दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच मिनिटाला नाहुएल मोलिनाच्या पासवर मॅक अ‍ॅलिस्टरने गोल करत अर्जेटिनाला आघाडीवर नेले. त्यानंतर एंझो फर्नाडेझने पोलंडचा बचाव भेदला आणि अल्वारेझकडे पास दिला. अल्वारेझनेही चपळाने फटका मारताना चेंडूला गोलजाळीची दिशा दिली. यानंतर पोलंडला पुनरागमन करता आले नाही.

अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता

क-गटातून अर्जेटिनासह कोणता संघ बाद फेरीत प्रवेश करणार याची अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता होती. अर्जेटिनाविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे पोलंडचा संघ स्पर्धेबाहेर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. एकाच वेळी सुरू असलेल्या या गटातील अन्य सामन्यात मेक्सिकोचा संघ सौदी अरेबियाविरुद्ध २-० आघाडीवर असेपर्यंत पोलंडचा बाद फेरीतील प्रवेश संकटात होता. मात्र, भरपाई वेळेत सौदी अरेबियाने गोल करून मेक्सिकोचे खेळाडू आणि चाहत्यांना निराश केले. या गोलमुळे मेक्सिकोचा संघ गोल सरासरीत मागे पडला आणि पोलंडचा बाद फेरीत प्रवेश झाला. पोलंडला यशाचे श्रेय गोलरक्षक वॉयचेक शेझनीला जाते. पूर्वार्धात आणि ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत शेझनीने अप्रतिम गोलरक्षण करत अर्जेटिनाला आणखी गोल करण्यापासून रोखले. त्याने आठ फटके अडवले. तसेच पेनल्टीसह मेसीने मारलेले तीन फटके शेझनीने फोल ठरवले.

३६ पोलंडच्या संघाला तब्बल ३६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची बाद फेरी गाठण्यात यश आले. यापूर्वी पोलंडने १९८६च्या स्पर्धेत ही कामगिरी केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 05:57 IST
Next Story
FIFA World Cup 2022 : गोलफरकामुळे मेक्सिकोचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात