fifa world cup 2022 france vs tunisia france loses to tunisia zws 70 | Loksatta

Fifa World Cup 2022 : टय़ुनिशियाकडून फ्रान्सचा पराभव

काझरीने ५८व्या मिनिटाला लायडुनीच्या पासवर २५ यार्डावरून जोरदार फटका मारत फ्रान्सचा गोलरक्षक मन्डाडाला चकवले.

Fifa World Cup 2022 : टय़ुनिशियाकडून फ्रान्सचा पराभव
ड-गटातील अखेरच्या सामन्यात टय़ुनिशियाने फ्रान्सचा १-० असा पराभव केला.

अल रायन : बाद फेरीतील स्थान आधीच निश्चित झाल्याने संघात केलेले अमूलाग्र बदल, टय़ुनिशियाचे धारदार आक्रमण आणि अखेरच्या सेंकदाला ‘व्हीएआर’ने विरोधात निर्णय दिल्याचा परिणाम फ्रान्सच्या कामगिरीवर झाला आणि विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील त्यांची विजयी मालिका खंडित झाली. ड-गटातील अखेरच्या सामन्यात टय़ुनिशियाने फ्रान्सचा १-० असा पराभव केला.

या पराभवानंतरही फ्रान्सने गटातील अग्रस्थान कायम राखले. मात्र, त्यांना दुबळय़ा संघाकडून पराभव पत्करण्याची नामुष्की सहन करावी लागली. अन्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने डेन्मार्कवर मात केल्याने टय़ुनिशियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

सामन्याच्या ५८व्या मिनिटाला वहाबी काझरीने टय़ुनिशियाने आघाडीवर नेले होते. त्यानंतर सामन्याच्या अखेरच्या सेकंदाला अ‍ॅन्टोन ग्रीझमनने फ्रान्सला बरोबरी साधून दिली होती. मात्र, पंचांनी ‘व्हीएआर’ची मदत घेतली. ‘व्हीएआर’ने ग्रीझमनला ऑफसाईड ठरवल्याने फ्रान्सचा गोल ग्राह्य धरला गेला नाही.

फ्रान्सने गेल्या सामन्यात खेळलेल्या नऊ खेळाडूंना विश्रांती दिली. पावार्ड, ग्रीझमन, जिरुड, डेम्बेले, राबियो अशा सर्वच प्रमुख खेळाडूंना संघाबाहेर ठेवण्यात आले. राखीव खेळाडूंनाही पुरेशी संधी मिळावी या हेतूने फ्रान्सने बदल केले खरे, पण त्यांचा हा निर्णय धोकादायक ठरला. टय़ुनिशियाच्या काझरी, लायडुनी या आक्रमकांनी पूर्वार्धात सातत्याने फ्रान्सच्या बचाव फळीची परीक्षा पाहिली. त्यांचे प्रयत्न फ्रान्सचा सर्वात वयस्क गोलरक्षक ३७ वर्षीय स्टीव्ह मन्डाडाच्या चपळतेने हाणून पाडले.

फ्रान्सच्या खेळाडूंना पूर्वार्धात चेंडूवर नियंत्रण मिळवणे कठीण जात होते. यानंतरही फ्रान्सच्या नव्या फळीच्या खेळाडूंनी जिद्द सोडली नव्हती. त्यांनी संधी मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, टय़ुनिशियाचा बचाव भक्कम राहिला.

उत्तरार्धाच्या खेळात टय़ुनिशियाची आक्रमणे कमी झाली नाहीत. अशाच एका प्रयत्नात काझरीने ५८व्या मिनिटाला लायडुनीच्या पासवर २५ यार्डावरून जोरदार फटका मारत फ्रान्सचा गोलरक्षक मन्डाडाला चकवले. काझरीचा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील पहिला गोल ठरला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 04:49 IST
Next Story
Fifa World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाचा डेन्मार्कला धक्का; विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक