scorecardresearch

FIFA World Cup 2022: इराणची वेल्सवर सरशी; भरपाई वेळेत चेश्मी, रमिनचे निर्णायक गोल

यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत बहुतेक सामन्यात भरपाई वेळ निर्णायक ठरत आहेत.

FIFA World Cup 2022: इराणची वेल्सवर सरशी; भरपाई वेळेत चेश्मी, रमिनचे निर्णायक गोल
रमिन रेझाएन

पीटीआय, अल रायन : रौझबेह चेश्मी (९०+८ वे मिनिट) आणि रमिन रेझाएन (९०+११वे मिनिट) यांनी भरपाई वेळेत नोंदवलेल्या निर्णायक दोन गोलच्या जोरावर इराणने ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी ब-गटाच्या सामन्यात वेल्सचा २-० असा पराभव केला. यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत बहुतेक सामन्यात भरपाई वेळ निर्णायक ठरत आहेत. बदलत्या नियमानुसार या वेळी अन्य स्पर्धापेक्षा भरपाई वेळेचा कालावधी अधिक मिळत आहे. याचाच फायदा घेत इराणच्या खेळाडूंनी गॅरेथ बेलच्या वेल्स संघाचा पराभव केला. या विजयाने इराणचा संघ ब-गटात दुसऱ्या स्थानावर आला, तर वेल्सचा संघ चौथ्या स्थानावर घसरला.

सामन्याच्या ८६व्या मिनिटाला वेल्सचा गोलरक्षक वेन हेनेसीने इराणच्या मेहदी तारेमीला चुकीच्या पद्धतीने पाडले. मैदानावरील हा प्रसंग तणावपूर्ण ठरला. मात्र, पंचांनी खेळाडूंवर नियंत्रण राखत हेनेसीला थेट लाल कार्ड दाखवून सामन्याबाहेर काढले. यंदाच्या स्पर्धेत लाल कार्ड मिळालेला हेनेसी पहिला खेळाडू ठरला. त्याची जागा बदली गोलरक्षक डॅनी वॉर्डने घेतली आणि वेल्सला उर्वरित सामन्यात १० खेळाडूंनिशी खेळावे लागले.

९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेतील आठव्या मिनिटाला चेश्मीने गोलकक्षाच्या काहीशा दुरून अप्रतिम किक मारली. या वेळी वेल्सचा गोलरक्षक वॉर्डचा झेप घेऊन गोल अडविण्याचा प्रयत्न फोल ठरला. त्यानंतर भरपाई वेळेतील११व्या मिनिटाला रेझाएनने मारलेला फटका अडवण्यातही वॉर्ड अपयशी ठरला.

    गॅरेथ बेलचा विक्रम   

वेल्सचा कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू गॅरेथ बेलला या सामन्यात सर्वोत्तम खेळ करता आला नाही. मात्र, या सामन्यात त्याने विक्रमाची नोंद केली. बेलचा हा वेल्ससाठी ११०वा सामना होता. त्यामुळे वेल्ससाठी सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम बेलच्या नावे झाला आहे.

इराणमधील संघर्षांचे कतारमध्ये पडसाद

इराणमधील राजकीय संघर्षांचे पडसाद कतारमध्येही उमटत आहेत. इराणच्या ‘फिफा’ विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात याचा प्रत्यय आला. वेल्सविरुद्ध ब-गटातील सामना सुरू होण्यापूर्वी स्टेडियमबाहेर सरकार विरोधी आणि सरकार समर्थक आंदोलक समोरासमोर आले. त्यावेळी परिस्थिती तणावपूर्ण झाली. इराणच्या काही चाहत्यांनी अन्य चाहत्यांकडून पर्शियन क्रांतीपूर्व झेंडे काढून घेतले. तसेच ‘स्त्री, जीवन आणि स्वातंत्र्य’ असे लिहिलेले कपडे परिधान केलेल्या आंदोलकांच्या विरोधातही इराण सरकारच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. या परस्पर विरोधी घोषणांच्या पार्श्वभूमीवरच नंतर सामना पार पडला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 02:21 IST

संबंधित बातम्या