Argentina vs Cape Verde: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. शनिवारी पार पडलेल्या राऊंड ऑफ ३२ फेरीतील सामन्यात गतविजेता अर्जेंटिना आणि केप व्हर्डे या दोन्ही संघांमध्ये थरारक सामना रंगला. ५ लाख ३० हजार लोकसंख्या असलेला देश जगातील सर्वात बलाढ्य फुटबॉल संघावर भारी पडला. हा सामना केप व्हर्डे संघाने ३-२ ने गमावला. पण कोट्यवधी फुटबॉल चाहत्यांच्या मनात घर केलं. केप व्हर्डे संघाने हा सामना २-२ ने बरोबरीत आणला होता, त्यामुळे सामना एक्स्ट्रा टाईममध्ये गेला होता. शेवटी क्रिस्टियन रोमेरोने दमदार गोल केला अर्जेंटिनाने हा सामना जिंकून राऊंड ऑफ १६ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं.

लिओनेल मेस्सीची जादू

लिओनेल मेस्सी या स्पर्धेतही अर्जेंटिनासाठी ट्रम्प कार्ड ठरतोय. सामन्यातील २९ व्या मिनिटाला मिड फील्डवरून लिसँड्रो मार्टिनेजने पास दिला, मेस्सीने उत्तमप्रकारे बॉल रिसिव्ह केला आणि दमदार गोल केला. यासह अर्जेंटिनाने या सामन्यातील पहिला गोल केला.

पण केप व्हर्डे संघाने देखील दमदार प्रसूत्तर दिलं. या सामन्यातील ५९ व्या मिनिटाला डेरोए डुआर्टेने अर्जेंटिनाचा स्टार गोलकीपर एमी मार्टिनेजला चकवा देत दमदार गोल केला. त्यामुळे सामना १-१ ने बरोबरीत आला. त्यानंतर कुठलाही संघ गोल करू शकला नाही. त्यामुळे सामना एक्स्ट्रा टाईममध्ये गेला होता.

एक्स्ट्रा टाईममध्ये ९२ व्या मिनिटाला अर्जेंटिनाला कॉर्नर मिळाला, लिओनेल मेस्सीने दमदार किक मारली आणि लिसँड्रो मार्टिनेजने मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन गोल करत अर्जेंटिनाला २-१ ने आघाडी मिळवून दिली. पण केप व्हर्डेचा संघ माघार घ्यायला काही तयार नव्हता. सामन्यातील १०३ व्या मिनिटाला लॉप्स कॅबरलने दमदार गोल केला आणि सामना २-२ ने बरोबरीत आणला.

सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जाणार की काय? असं चित्र असताना १११ व्या मिनिटाला अर्जेंटिनाने दमदार पुनरागमन केलं. अर्जेंटिनाला एक कॉर्नर मिळाला, मेस्सीने गोल करण्याची संधी निर्माण करून दिली. त्यावेळी डिफेंडर क्रिस्टियनने हवेत उडून डोक्याने गोल केला. हा गोल झाल्यानंतर रेफ्रीने VAR मध्ये चेक केलं, जोपर्यंत रेफ्रीचा निर्णय येत नव्हता, तोपर्यंत संपूर्ण स्टेडियम शांत होतं, पण जसा रेफ्रीने गोल झाल्याचा इशारा केला, स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. अर्जेंटिनाने केप व्हर्डेवर ३-२ ने निर्णायक आघाडी घेतली. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. यासह सामना जिंकून राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला. राऊंड ऑफ १६ मध्ये अर्जेंटिनाचा सामना इजिप्तविरुद्ध होणार आहे.