Kylian Mbappe wins Golden Boot in FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषक २०२६ चा विजेता स्पेनचा संघ ठरला. स्पर्धेच्या अखेरीस देण्यात येणाऱ्या वैयक्तिक पुरस्कारांमध्येही अनेक दिग्गज खेळाडूंनी बाजी मारली. अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा १-० असा पराभव करत विश्वविजेतेपद पटकावलं, तर त्यानंतर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंचीही घोषणा करण्यात आली. मेस्सीला मागे टाकत किलियन एम्बाप्पे गोल्डन बूटचा मानकरी ठरला.
फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पे याने सलग दुसऱ्यांदा गोल्डन बूट पुरस्कारावर नाव कोरलं. एम्बाप्पेने संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक १० गोल करत अव्वल गोलस्कोररचा मान पटकावला. अंतिम सामन्यात लिओनेल मेस्सीला ना गोल करता आला, ना गोलसाठी सहाय्य (असिस्ट) करता आलं. त्यामुळे तो ८ गोलांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. विशेष म्हणजे, २०२२ च्या कतार विश्वचषकातही एम्बाप्पेने ७ गोल करत मेस्सीपेक्षा एक गोल अधिक नोंदवत गोल्डन बूट जिंकला होता. त्यामुळे मेस्सीवर सलग दुसऱ्या विश्वचषकात एम्बाप्पेने बाजी मारली.
विश्वविजेता स्पेनच्या खेळाडूंनी इतर प्रमुख पुरस्कारांवरही वर्चस्व गाजवलं. स्पेनचा गोलरक्षक उनाय सिमोन याने संपूर्ण स्पर्धेत केवळ एकच गोल स्वीकारत गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार पटकावला. तर मधल्या फळीतील स्टार खेळाडू रोद्री याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गोल्डन बॉल पुरस्कार देण्यात आला. स्पेनचा युवा बचावपटू पाऊ कुबार्सी याची स्पर्धेतील सर्वोत्तम युवा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये सर्वाधिक गोल करणारे खेळाडू
किलियन एम्बाप्पे – फ्रान्स – १० गोल
लिओनेल मेस्सी – अर्जेंटिना – ८ गोल
जूड बेलिंगहॅम – इंग्लंड – ७ गोल
एर्लिंग हालंड – नॉर्वे – ७ गोल
उस्मान डेंबेले – फ्रान्स – ६ गोल
फिफा विश्वचषक २०२६ मधील प्रमुख पुरस्कार
गोल्डन बूट: किलियन एम्बाप्पे (फ्रान्स)
गोल्डन ग्लोव्ह: उनाय सिमोन (स्पेन)
गोल्डन बॉल: रोद्री (स्पेन)
सर्वोत्तम युवा खेळाडू: पाऊ कुबार्सी (स्पेन)
FIFA WC 2026: अंतिम सामन्यात नेमकं काय घडलं?
अतिरिक्त वेळेत (एक्स्ट्रा टाईम) स्पेनच्या फेरान टोरेसने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर गतविजेत्या अर्जेंटिनाचा १-० असा पराभव करत फिफा विश्वचषक २०२६ चे विजेतेपद पटकावलं. अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या टोरेसने रिबाऊंडवर अचूक फटका मारत स्पेनला आघाडी मिळवून दिली. हा गोल अखेर निर्णायक ठरला आणि स्पेनने आपल्या इतिहासातील दुसऱ्या विश्वचषक विजेतेपदावर नाव कोरलं.
दुसरीकडे, अर्जेंटिनाला सामन्याच्या उत्तरार्धात मोठा धक्का बसला. एन्झो फर्नांडेझ याला दुसरं पिवळं कार्ड मिळाल्याने स्टॉपेज टाइममध्ये मैदानाबाहेर जावं लागलं आणि अर्जेंटिनाला उर्वरित सामना १० खेळाडूंसह खेळावा लागला. या सामन्यात अर्जेंटिनाची आक्रमक फळी पूर्णपणे निष्प्रभ ठरली. तब्बल ११५ मिनिटांपर्यंत संघाला लक्ष्यावर किंवा लक्ष्याबाहेरही एकही फटका (शॉट) मारता आला नाही.
