Hosam Hassan On Palestine: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील राऊंड ऑफ १६ फेरीतील सामना अर्जेंटिना आणि इजिप्त या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या दोन्ही संघांमध्ये अतिशय अटीतटीचा सामना रंगला. शेवटी अर्जेंटिनाने हा सामना ३-२ च्या फरकाने जिंकून क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला. याआधी झालेल्या राऊंड ऑफ ३२ फेरीतील सामन्यात इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने- सामने आले होते. हा सामना इजिप्तने पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ च्या फरकाने जिंकून ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर केलं होतं. हा इजिप्तसाठी खूप मोठा विजय होता. या विजयानंतर इजिप्तचे मुख्य प्रशिक्षक आणि फुटबॉल विश्वातील दिग्गज व्यक्तिमत्त्व होसम हसन यांनी सामन्यानंतर केलेल्या एका कृतीने आणि वक्तव्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
इजिप्तचा राऊंड ऑफ १६ फेरीतील सामना अर्जेंटिनाविरुद्ध पार पडला. या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना होसम हसन फुटबॉलचा विषय बाजूला ठेवून, पॅलेस्टिनींना एक भावनिक आवाहन केले. याआधी ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर हसन हे पॅलेस्टिनी ध्वज घेऊन मैदानात उतरले होते. इजिप्तचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय हा त्यांनी पॅलेस्टिनी जनतेला समर्पित केला.
हसनचे पॅलेस्टाईनच्या जनतेला भावनिक आव्हान
अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेतील एका प्रश्नाचं उत्तर देताना हसन म्हणाले की, “पॅलेस्टाईनमध्ये जे काही घडत आहे, ते संपूर्ण जगासाठी आणि मानवतेसाठी एक मोठा कलंक आहे. तिथे निष्पाप लोकांचा जीव जात असताना जग शांत बसू शकत नाही.” ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या नेतृत्वाखालील इस्त्रायलवरील हल्ल्यानंतर जो गाझामधील संघर्ष सुरु झाला. या संघर्षात एएफपीच्या आकडेवारीनुसार १२२१ लोकांचा मृत्यू झाला आहे.
हसन यांनी जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेत पॅलेस्टिनींचा मुद्दा मांडला. “पॅलेस्टिनी लोकांना त्यांच्या इच्छेनुसार जगू द्या, त्यांना त्यांचे अस्तित्व टिकवू द्या”, असेही ते म्हणाले.फिफाच्या नियमानुसार, फुटबॉल मैदानावर कोणत्याही राजकीय, धार्मिक किंवा वैयक्तिक घोषणाबाजीवर आणि चिन्हांच्या प्रदर्शनावर कडक बंदी आहे. असं असतानाही हसन यांनी पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवल्यामुळे त्यांच्यावर फिफाकडून दंडात्मक कारवाई किंवा मग निलंबणाची कारवाई केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
