Donald Trump Viral Video: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील फायनलचा थरार अर्जेंटिना आणि स्पेन या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अतिशय अटीतटीचा सामना रंगला. ९० मिनिटे दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. शेवटी एक्स्ट्रा टाईमध्ये फेरान टॉरेसने एकमेव गोल केला आणि बलाढ्य अर्जेंटिनावर स्पेनने १-० ने विजय मिळवला. या विजयासह स्पेनने २०१० नंतर जेतेपदावर नाव कोरलं. १६ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवल्यानंतर स्पेनच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेनच्या संघाला ट्रॉफी देत असताना असं काही केलं, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
स्पेनसाठी हा विजय अतिशय खास आहे. कारण २०१० नंतर या संघाला जेतेपदाची एकही ट्रॉफी जिंकता आली नव्हती. ३ वर्ल्डकप स्पर्धांमध्ये रिकाम्या हाती परतल्यानंतर अखेर १६ वर्षांनंतर स्पेनने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. या संघाने अर्जेंटिनावर १-० ने थरारक विजयाची नोंद केली. संपूर्ण सामन्यात एकमेव गोल झाला, जो फेरान टॉरेसने केला. या गोलच्या बळावर स्पेनने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडीओ होतोय व्हायरल
स्पेनच्या विजयानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. तर झाले असे की, वर्ल्डकप विजेत्या स्पेन संघातील खेळाडू फिफाची ट्रॉफी घेण्यासाठी स्टेजवर आले. त्यावेळी स्पेनला ट्रॉफी देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि फिफाचे अधिकारी स्टेजवर उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प आणि फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी मिळून ट्रॉफी स्पेनच्या कर्णधाराला ट्रॉफी दिली. त्यानंतर ट्रम्प आणि जियानी यांनी खेळाडूंची अभिनंदन केलं. जियानी तर ट्रॉफी दिल्यानंतर निघून गेले, पण ट्रम्प तिथेच थांबले. ते स्पेनसोबत विजयाचा जल्लोष करताना दिसून आले. स्पेनच्या संघाला सेलिब्रेशन करायचं होतं, त्यामुळे स्पेनचा कर्णधार रोड्री याने ट्रम्प यांना जाण्यास सांगितलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
स्पेनचा ऐतिहासिक विजय
या सामन्यात अर्जेंटिनाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण स्पेनकडून दमदार खेळ पाहायला मिळाला. स्पेनने या सामन्यात अर्जेंटिनाला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. सामन्यातील १०६ व्या मिनिटाला फेरान टॉरसने एकमेव गोल केला. या गोलच्या बळावर स्पेनचा संघ दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. याआधी २०१० मध्ये स्पेनने नेदरलँड्सला १-० ने हरवून जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती.
