FIFA World Cup Golden Boot Race: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील राऊंड ऑफ १६ फेरीतील सामने पूर्ण झाले असून आता क्वार्टर फायनलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण ६४ संघ जेतेपदाची ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरले होते. त्यापैकी केवळ ८ संघ शिल्लक राहिले आहेत.या स्पर्धेतील क्वार्टर फायनलच्या सामन्यांचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ही स्पर्धा कोणता संघ जिंकणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे. यासह यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत गोल्डन बूटचा मानकरी कोण ठरणार? अशी देखील चर्चा सुरु आहे. दरम्यान कोणते खेळाडू गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, जाणून घ्या.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू गोल्डन बूटचा मानकरी ठरतो. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी राहणाऱ्या खेळाडूला सिल्वर आणि ब्राँझ बूट दिला जातो. या स्पर्धेत अर्जेंटिनाने आतापर्यंत दमदार खेळ केला आहे. राऊंड ऑफ १६ फेरीतील सामन्यात अर्जेंटिनाने इजिप्तला पराभूत करुन टॉप ८ मध्ये प्रवेश केला आहे. अर्जेंटिनाला ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. तसेच अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सीला गोल्डन बूट जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मेस्सी सध्या ८ गोलसह गोल्डन बूटच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. तर किलियन एम्बाप्पे या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. एम्बाप्पेच्या नावे ७ गोल करण्याची नोंद आहे. तर नॉर्वेचा स्टार अर्लिंग हालंड या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. हालंडच्या नावे देखील ७ गोल करण्याची नोंद आहे. मुख्य बाब म्हणजे गोल्डन बूटच्या शर्यतीत असलेल टॉप ३ खेळाडू क्वार्टर फायनलचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे तिघांनाही गोल करुन या यादीत वर जाण्याची संधी असणार आहे.

यावेळी लिओनेल मेस्सीला गोल्डन बूट जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मुख्य बाब म्हणजे मेस्सीने आजवर एकदाही गोल्डन बूटचा मान पटकावलेला नाही. २०२२ मध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटिनाने जेतेपदाचा मान पटकावला होता. या स्पर्धेत मेस्सीने ७ गोल केले होते. यासह सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी होता. तर अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघातील खेळाडू किलियन एम्बाप्पे ८ गोलसह गोल्डन बूटचा मानकरी ठरला होता. त्यामुळे यावेळी मेस्सी बाजी मारणार की पुन्हा एकदा एम्बाप्पे गोल्डन बूट पुरस्कार पटकावणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

‘फिफा वर्ल्डकप २०२६’ स्पर्धेतील क्वार्टर फायनलचे सामने (भारतीय वेळेनुसार)

फ्रान्स विरुद्ध मोरोक्को – शुक्रवार, १० जुलै, रात्री १:३० वाजता

स्पेन विरुद्ध बेल्जियम – शनिवार, ११ जुलै, रात्री १२:३० वाजता

इंग्लंड विरुद्ध नॉर्वे- रविवार, १२ जुलै, रात्री २:३० वाजता

अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड- रविवार, १२ जुलै, सकाळी ६:३० वाजता