USA- Iran War, Fifa World Cup: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा थरार अमेरिकेत रंगणार आहे. इराणचा संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या संघांपैकी एक होता. मुख्य बाब म्हणजे, केवळ संघांच्या सहभागाच्या बाबतीतच नव्हे, तर व्यावसायिकदृष्ट्याही ही आतापर्यंतची सर्वात मोठी स्पर्धा ठरू शकते. या स्पर्धेतून ११ अब्ज डॉलर्सहून अधिक महसूल मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान अमेरिक- इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचा संघ फिफा वर्ल्डकप स्पर्धा खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता पण फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

अमेरिका- इराणच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, इराणचा संघ फिफा वर्ल्डकप खेळण्यासाठी येणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इराणच्या क्रीडा मंत्र्यांनी गेल्या महिन्यात फिफि वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार की नाही, याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते, “या भ्रष्ट राजवटीने आमच्या नेत्याची हत्या केली आहे, हे लक्षात घेता आम्ही कोणत्याही परिस्थितीत विश्वचषकात सहभागी होऊ शकत नाही.”

पण फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी खात्रीशीरपणे सांगितले आहे की, इराणचा संघ नक्कीच येणार आहे. वॉशिंग्टन डीसी येथील सीएनबीसीच्या एका इन्व्हेस्ट इन अमेरिका फोरममध्ये बोलताना ते म्हणाले, “आम्हाला आशा आहे की, तोपर्यंत परिस्थिती शांतपूर्ण असेल ज्यामुळे निश्चितच मदत होईल. इराणला यावेच लागेल, ते त्यांच्या लोकांचे प्रतिनिधित्व करतात. ते या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. खेळाडूंनाही खेळायचं आहे.”

इन्फँटिनो पुढे म्हणाले की, “त्यांनी खेळायला हवं, खेळ राजकारणापासून दूर असायला हवेत..” इन्फँटिनो यांच्या मते, इराणचा संघ फिफा वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पण इराणकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. इराणच्या क्रीडा मंत्र्यांनी इराणचा संघ फिफा वर्ल्डकपमध्ये सहभाग घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. या भूमिकेवर ते ठाम राहणार, की आपला निर्णय बदलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इराणचा संघ फिफा वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. इराणचे गट फेरीतील तिन्ही सामने अमेरिकेत खेळवले जाणार आहेत. इराणचा संघ १५ जूनला लॉस एंजेलिसमध्ये न्यूझीलंडचा सामना करणार आहे. तर २१ जून रोजी बेल्जियम संघाचा सामना करणार आहे. हा सामना देखील लॉस एंजेलिसमध्ये खेळवला जाणार आहे. तर साखळी फेरीतील तिसरा सामना २६ जून रोजी सिएटलमध्ये इजिप्तविरूद्ध खेळवला जाणार आहे. जर गट फेरीतील सामने जिंकून इराणचा संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरला, तर पुढचे सामने देखील अमेरिकेत खेळवले जाऊ शकतात.