FIFA World Cup 2026 Live Telecast Rights: भारतातील फुटबॉलप्रेमींसाठी अखेरीस आनंदाची बातमी आली आहे. फुटबॉलचा सर्वात मोठा सोहळा फिफा विश्वचषक २०२६ भारतात आता लाईव्ह पाहता येणार आहे. फिफा विश्वचषक भारतात लाईव्ह प्रसारण करण्यासाठी ब्रॉडकास्टर तयार नव्हते, पण आता मात्र ब्रॉडकास्टिंगचे राईट्स भारतातील कंपनीला मिळाले असून, फिफा विश्वचषक भारतात पाहता येणार आहे.

फुटबॉलची जगातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या फिफा विश्वचषक २०२६ ला येत्या १२ जूनपासून सुरूवात होणार आहे. फुटबॉलमधील त्रिकुट आणि चाहत्यांचे लाडके लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो व नेमायर विश्वचषकात खेळताना दिसणार आहेत. ही स्पर्धा होण्याच्या एक आठवडाआधी आता झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडने फिफाशी करार केला आहे. त्यांनी या वर्षीचा विश्वचषक, २०२७ चा महिला विश्वचषक आणि २०३० च्या विश्वचषकासह ३९ जागतिक फुटबॉल स्पर्धांचे प्रसारण करण्यासाठी फिफासोबत करार केला आहे.

फिफा विश्वचषक २०२६ कुठे लाईव्ह पाहता येणार?

फुटबॉलचे सामने झीच्या नव्याने सुरू झालेल्या युनाईट८ स्पोर्ट्स चॅनल्सवर दाखवले जातील: युनाईट८ स्पोर्ट्स १, युनाईट८ स्पोर्ट्स १ एचडी, युनाईट८ स्पोर्ट्स २ आणि युनाईट८ स्पोर्ट्स २ एचडी, आणि झी५ वर स्ट्रीम केले जातील. हा करार अंदाजे ३५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (₹३३२ कोटी) किमतीचा असल्याचे मानले जाते. पण, झीच्या अधिकृत निवेदनात रकमेचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

“भारतीय बाजारपेठ फिफासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण येथील तरुण आणि उत्साही प्रेक्षकांमुळे त्यात प्रचंड क्षमता आहे. आम्हाला विश्वास आहे की, झीचे व्यापक प्रसारण आणि डिजिटल वितरण, स्थानिक प्रेक्षकांची त्यांची सखोल जाण आणि मल्टी-प्लॅटफॉर्म क्षमता, संपूर्ण भारतातील प्रेक्षकांपर्यंत फुटबॉलची पोहोच वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील,” असे फिफाचे मुख्य व्यवसाय अधिकारी रोमी गाई यांनी निवेदनात म्हटलं आहे.

भारतातील आघाडीची क्रीडा प्रसारण संस्था जिओस्टार यांनी २०२२ फिफा विश्वचषकाचे प्रसारण आपल्या पूर्वीच्या व्हायकॉम18 नेटवर्कद्वारे केले होते. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार, जिओस्टारने फिफा विश्वचषक २०२६च्या प्रसारण हक्कांसाठी सुमारे २ कोटी अमेरिकन डॉलर्स (२० दशलक्ष डॉलर) इतकी बोली लावली होती. मात्र, फिफाने ही ऑफर नाकारली.

दरम्यान, २०१४ आणि २०१८ फिफा विश्वचषकाचे भारतातील प्रसारण करणाऱ्या सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियानेही प्रसारण हक्कांबाबत चर्चा केली होती. मात्र, अखेरीस त्यांनी अधिकृत बोली सादर केली नाही. या करारामुळे भारतात फिफा विश्वचषक २०२६चे प्रसारण होणार की नाही, याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉलप्रेमींना इतिहासातील पहिला ४८ संघांचा फिफा विश्वचषक पाहण्याची संधी मिळणार आहे.