FIFA World Cup 2026 Match Timings in India: फुटबॉलमधील जगातील सर्वात मोठी स्पर्धा फिफा विश्वचषक २०२६ ला आता सुरूवात होणार आहे. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल ४८ संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांत हा फुटबॉल विश्वचषक आयोजित केला जात आहे. ही स्पर्धा ११ जून ते १९ जुलै या कालावधीत खेळवली जाईल. या स्पर्धेदरम्यान १६ वेगवेगळ्या शहरांमध्ये विक्रमी १०४ सामने होणार आहेत. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार, जाणून घेऊया.

यंदा एकूण ४८ संघ सहभागी होणार असल्याने चार चार संघांना १२ गटांमध्ये विभागलं आहे. स्पर्धेच्या विस्तारित स्वरूपामुळे चाहत्यांना अधिक संघ, अधिक सामने आणि नॉकआउट स्टेजमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत; म्हणूनच याला इतिहासातील सर्वात मोठा विश्वचषक मानलं जात आहे.

गट-फेरीत प्रत्येक संघ तीन सामने खेळेल आणि त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ थेट बाद फेरीत प्रवेश करतील. याव्यतिरिक्त, तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या सर्वोत्तम आठ संघांनाही पुढे जाण्याची संधी मिळेल, ज्यामुळे एकूण ३२ संघ बाद फेरीपर्यंत पोहोचू शकतील. ‘राऊंड ऑफ ३२’ च्या या समावेशामुळे, अंतिम फेरीपर्यंत पोहोचणाऱ्या संघांना आता सातऐवजी आठ सामने खेळावे लागतील.

भारतात किती वाजता होणार फिफा विश्वचषकाचे सामने?

या स्पर्धेची सुरुवात ११ जून रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार १२ जून) होईल; यात यजमान मेक्सिकोचा सामना मेक्सिको सिटीमधील ऐतिहासिक ‘एस्तादियो अझ्टेका’ (Estadio Azteca) येथे दक्षिण आफ्रिकेशी होईल. दरम्यान, फुटबॉलच्या या भव्य विश्वचषकाचा अंतिम सामना १९ जुलै रोजी न्यूयॉर्क/न्यू जर्सी येथील ‘मेटलाइफ स्टेडियम’ (MetLife Stadium) वर खेळवला जाईल, जिथे फुटबॉलमधील जगज्जेता संघ मिळेल. फिफा विश्वचषक २०२६ मधील सर्व सामने झी टीव्हीने नव्याने लाँच केलेल्या युनिट८ स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहायला मिळतील, तर झी फाईव्ह या मोबाईलवर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग असेल.

या विश्वचषकादरम्यान सामने पाहण्यासाठी भारतीय फुटबॉल चाहत्यांना रात्री उशिरापर्यंत जागावं लागणार आहे. भारत आणि यजमान देश यांच्यात वेळेच्या बाबतीत मोठा फरक आहे; त्यामुळे, बहुतेक सामने रात्री उशिरा किंवा पहाटे खेळवले जातील. फुटबॉल विश्वचषकातील बहुतांश सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार चार विशिष्ट वेळांच्या सत्रांमध्ये सुरू होतील.

भारतात बहुतेक सामने मध्यरात्री १२:३०, पहाटे ३:३० आणि पहाटे ६:३० वाजता सुरू होतील. दरम्यान, काही निवडक सामने सकाळी ७:३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुरू होतील. या स्पर्धेतील मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सलामीचा सामना १२ जून रोजी मध्यरात्री १२:३० वाजता सुरू होणार आहे. भारतीय फुटबॉल संघ या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही; त्यामुळे संघ या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.