Mexico vs Ecuador: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेतील राऊंड ऑफ ३२ फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील महत्वाचा सामना इक्वेडोर आणि मेक्सिको या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मेक्सिकोने इक्वेडोर संघावर २-० ने दमदार विजयाची नोंद केली. या विजयानंतर मेक्सिकोच्या चाहत्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. या जल्लोषाला गालबोट लागलं आहे. या जल्लोषादरम्यान ३ चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मेक्सिकोने राऊंड ऑफ ३२ फेरीत इक्वेडोरला पराभूत करुन राऊंड ऑफ १६ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. या दमदार विजयानंतर जल्लोष तर होणारच होता. त्यामुळे हजारो चाहते रस्त्यावर एकवटले आणि विजयाचा जल्लोष करु लागले. यादरम्यान श्वास कोंडल्यामुळे ३ चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही दु:खद घटना मेक्सिकोतील हॅम्बर्गो आणि लँकेस्टरच्या रस्त्यांवर घडली. चाहत्यांच्या जल्लोषाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

माध्यमातील वृ्त्तानुसार, मेक्सिकोने एस्टाडियो एज्टेकाच्या मैदानावर इक्वेडोरचा २-० ने धुव्वा उडवला. या विजयानंतर पासेओ डे ला रिफोर्मा आणि या परिसराच्या आसपास राहणारे १० लाखाहूंन अधिक फुटबॉल चाहते एकत्र आले. इतका जनसमुदाय एकाच वेळी एकाच ठिकाणी जमल्यामुळे लोकांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्यामुळे ३ लोकांना श्वास कोंडल्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ज्यात २ महिला आणि एक ४४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

या दु:खद घटनेनंतर मेक्सिको सरकारचे प्रमुख क्लारा ब्रुगाडा मोलिना यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन अधिकृत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “स्थानिक आरोग्य सेवांच्या अहवालानुसार, मेक्सिको सिटीच्या आपत्कालीन पथकांनी पासेओ डेला रिफोर्मा जवळील वेगवेगळ्या ठिकाणी ३ लोक बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच त्वरित कारवाई केली. यावेळी सर्व वैद्यकीय आपत्कालीन प्रोटोकॉल सक्रीय करण्यात आले होते. मात्र, दुर्देवाने त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे.”