FIFA World Cup Prize Money: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेतील राऊंड ऑफ ३२ फेरीतील सामने सुरू आहेत. लवकरच राऊंड ऑफ १६ फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच ४८ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे बक्षिसाची रक्कमही मोठी असणार आहे. दरम्यान विजेता, उपविजेता आणि नॉकआऊट फेरीत प्रवेश करणाऱ्या संघांना किती रक्कम मिळणार? जाणून घ्या.

यावेळी फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेसाठी बक्षिसाची रक्कम ही वाढवण्यात आली आहे. आधी ही रक्कम ७२७ मिलियन डॉलर्स इतकी होती. पण एप्रिल महिन्यात फिफाकडून बक्षिसाची रक्कम वाढवण्यात आली होती. ही रक्कम ७२७ मिलियन डॉलर्सपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

विजेत्या संघाला किती रक्कम मिळणार?

फिफा वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला ५१ मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ४३३ कोटी रुपये मिळतील. तर उपविजेत्या संघाला ३४ मिलियन डॉलर्स (२८९ कोटी रुपये) मिळणार आहेत. तर या स्पर्धेत तिसऱ्या स्थानी राहणाऱ्या संघाला ३० मिलियन डॉलर्स (२५५ कोटी रुपये) तर चौथ्या स्थानी राहणाऱ्या संघाला २८ मिलियन डॉलर्स (२३८ कोटी रूपये) इतकी रक्कम मिळणार आहे.

नॉकआऊट फेरीत पोहोचणाऱ्या संघाला किती रक्कम मिळणार?

या स्पर्धेतील टॉप ८ मध्ये प्रवेश करणाऱ्या संघाला २० मिलियन डॉलर्स (१७० कोटी रुपये) मिळणार आहेत. तर राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश करणाऱ्या संघाला १६ मिलियन डॉलर्स (१३६ कोटी रुपये) तर राऊंड ऑफ ३२ मध्ये प्रवेश करणाऱ्या संघाला १२ मिलियन डॉलर्स (१०२ कोटी रूपये) मिळणार आहेत. तर जे संघ राऊंड ऑफ ३२ मध्ये मध्ये प्रवेश करू शकले नव्हते, अशा संघांना १० मिलियन डॉलर्स ( ८५ कोटी रुपये) मिळणार आहेत. आतापर्यंत झालेल्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोच्च रक्कम आहे.

यासह फिफाकडून सर्व ४८ संघांना १६८ मिलियन डॉलर्स दिले जाणार आहेत. प्रत्येक संघाला २.५ मिलियन डॉलर तयारीसाठी, सरावासाठी, प्रवासाचा खर्च आणि इतर खर्चासाठी दिले जाणार आहेत. यासह अतिरिक्त भत्ता दिला जाणार आहे. त्यामुळे वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या प्रत्येक संघाला १२.५ मिलियन डॉलर्स म्हणजे १०६ कोटी मिळणार आहेत.