FIFA World Cup 2026 Quarter Final Schedule: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेतीर राऊंड ऑफ १६ फेरीतील शेवटचा सामना कोलंबिया आणि स्वित्झर्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळाली. सामन्यातील दोन्ही हाफमध्ये एकही गोल झाला नव्हता. त्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटने लावण्यात आला. पेनल्टी शूटआऊटमध्ये स्वित्झर्लंडने कोलंबियावर ४-३ च्या फरकाने विजय मिळवला आणि स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. हा सामना स्वित्झर्लंड संघासाठी ऐतिहासिक ठरला. कारण तब्बल ७२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्वित्झर्लंडने फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. याआधी १९५४ मध्ये स्वित्झर्लंडने फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. या सामन्यासह फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारे आठही संघ ठरले आहेत. जाणून घ्या या सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक.
पेनल्टी शूटआऊटमध्ये स्वित्झर्लंडचा विजय
या महत्वाच्या सामन्यात स्वित्झर्लंडचा संघ आपल्या संघातील प्रमुख खेळाडू जोहान मन्जाम्बी शिवाय मैदानात उतरला होता. या सामन्याआधी सरावादरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी गोल करण्यासाठी पूर्ण जोर लावला. पण ९० मिनिटांत एकही गोल झाला नाही. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये सुरुवातीच्या ३ प्रयत्नांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी ३-३ गोल केले. पण चौथ्या प्रयत्नात कोलंबियाचा संघ गोल करु शकला नाही. त्यानंतर स्वित्झर्लंडकडून रुबेन वर्गासने गोल केला आणि आपल्या संघाला ४-३ च्या फरकाने दमदार विजय मिळवून दिला.
फिफा वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये जाणारे ८ संघ ठरले
या स्पर्धेतील राऊंड ऑफ १६ फेरीतील सर्व सामने पूर्ण झाले असून आता टॉप ८ संघ ठरले आहेत. जे या स्पर्धेतील क्वार्टर फायनलचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. या ८ पैकी ४ संघ पुढे सेमी फायनलचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतील. या ८ संघांमध्ये अर्जेंटिंना, फ्रान्स, स्वित्झर्लंड, स्पेन, बेल्जियम, नॉर्वे, मोरक्को आणि इंग्लंड या संघांचा समावेश आहे.
फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील क्वार्टर फायनलचे सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरु होतील?
फ्रान्स विरुद्ध मोरोक्को – शुक्रवार, १० जुलै, रात्री १:३० वाजता
स्पेन विरुद्ध बेल्जियम – शनिवार, ११ जुलै, रात्री १२:३० वाजता
इंग्लंड विरुद्ध नॉर्वे- रविवार, १२ जुलै, रात्री २:३० वाजता
अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड- रविवार, १२ जुलै, सकाळी ६:३० वाजता
