Jayden dies at home fifa world cup 2026 South Africa midfielder: फिफा विश्वचषक २०२६ मध्ये क्वार्टर फायनलचा थरार रंगत आहे. पण याचदरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फुटबॉलपटू आणि २०२६ फिफा विश्वचषकात देशाचं प्रतिनिधित्व करणारा मिडफिल्डर जेडन अॅडम्स याचं वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी निधन झालं आहे. काही आठवड्यांपूर्वीच विश्वचषकाच्या रंगमंचावर खेळलेला हा प्रतिभावान खेळाडू शनिवारी केपटाऊन येथे मृतावस्थेत आढळल्याची माहिती समोर आली आहे.

जेडन अॅडम्सच्या आकस्मिक निधनामुळे चाहत्यांसह संपूर्ण क्रीडाविश्वाला मोठा धक्का बसला असून, मृत्यूमागील नेमकं कारण शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून तपास सुरू आहे. विश्वचषकात जेडन अॅडम्सने दक्षिण आफ्रिकेच्या तिन्ही साखळी सामन्यांत खेळ केला होता. त्याच्या कामगिरीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने बाद फेरीत प्रवेश केला होता. मात्र, राऊंड ऑफ ३२मध्ये सह-यजमान कॅनडाकडून पराभव स्वीकारावा लागला.

कोण होता जेडन अॅडम्स?

५ मे २००१ रोजी केपटाऊन येथे जन्मलेल्या जेडन ऑस्विन अॅडम्सला दक्षिण आफ्रिकेच्या फुटबॉलमधील सर्वात आश्वासक मिडफिल्डरपैकी एक मानलं जात होतं. स्टेलेनबॉश एफसीच्या युवा संघातून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या क्लबकडून त्याने पाच हंगाम खेळताना सर्व स्पर्धांमध्ये १३९ सामने खेळले आणि संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर जानेवारी २०२५ मध्ये त्याची मामेलोडी सनडाउन्स क्लबमध्ये निवड झाली. तिथेही त्याने प्रीमियर सॉकर लीगमध्ये आपल्या खेळाने छाप पाडली.

२०२२ मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आणि त्यानंतर तो राष्ट्रीय संघाचा नियमित सदस्य बनला. त्याने देशासाठी नऊ आंतरराष्ट्रीय सामने खेळत दोन गोल केले. तसेच २०२३ आफ्रिका कप ऑफ नेशन्स स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला तिसरं स्थान मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. मिडफिल्डमधील दमदार कामगिरीच्या जोरावर त्याची २०२६ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात निवड झाली होती.

दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांनी शनिवारी सकाळी केपटाऊनच्या मध्यवर्ती भागातील शॉट्सचेक्लूफ उपनगरातील घरात २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचे क्रीडा, कला आणि संस्कृती मंत्री गेटन मॅकेंझी यांनी मृत्यूबाबत कोणतेही तर्क-वितर्क न लावण्याचं आवाहन केलं.

“जेडनच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे माध्यम प्रतिनिधी आणि नागरिकांनी संयम व संवेदनशीलता दाखवावी. या अत्यंत कठीण काळात त्याच्या कुटुंबीयांना आणि मामेलोडी सनडाउन्स क्लबला आवश्यक असलेली गोपनीयता आणि वेळ मिळू द्यावा. अधिकृत माहिती योग्य वेळी संबंधित यंत्रणांकडूनच जाहीर केली जाईल,” असं मॅकेंझी यांनी म्हटलं.