वृत्तसंस्था, कॅन्सस सिटी : ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेत बुधवारचा दिवस फुटबॉलविश्वातील सर्वांत मोठ्या तार्‍यांनी गाजवला. आधी फ्रान्सचा किलियन एम्बापे आणि नॉर्वेचा अर्लिंग हालँड यांनी प्रत्येकी दोन गोल करत विश्वचषकात रंगत आणली. त्यानंतर लिओनेल मेसी मैदानात उतरला आणि वयाच्या ३८ व्या वर्षीही दमदार कामगिरी करत त्याने पुन्हा एकदा प्रकाशझोत स्वत:कडे खेचला. मेसीच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर गतविजेत्या अर्जेंटिनाने सलामीच्या लढतीत अल्जीरियाचा ३-० असा पराभव केला. मेसीची विश्वचषक कारकीर्दीतील ही पहिली हॅट्ट्रिक ठरली, तसेच विश्वचषकात सर्वाधिक १६ गोलच्या जर्मनीच्या मिरोस्लाव्ह क्लोसाच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी साधली.

कॅन्सस सिटीच्या आकाशात सूर्य मावळत असताना मेसीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. तो सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळणारा इतिहासातील पहिला फुटबॉलपटू ठरला. त्याने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही मागे टाकले.
मेसीचा हा कारकीर्दीतील अखेरचा विश्वचषक ठरण्याची शक्यता असली, तरी आपल्या पायातील जादू अजूनही कायम असल्याचे त्याने पुन्हा एकदा अधोरेखित केले.

गेल्या (२०२२) विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या लढतीत अर्जेंटिनाला सौदी अरेबियाकडून पराभवाचा धक्का बसला होता. यावेळी त्या अपयशाची पुनरावृत्ती होणार नाही याची अर्जेंटिनाने आणि विशेषत: मेसीने काळजी घेतली.

अल्जीरियाविरुद्ध अर्जेंटिनाने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला मेसीने चेंडू जाळ्यात धाडला होता. मात्र, ‘ऑफसाइड’च्या निर्णयामुळे तो गोल बाद ठरला. अर्जेंटिनाने प्रयत्न सुरू ठेवले आणि त्यांना १७ व्या मिनिटाला यश मिळाले. मेसीने २५ यार्ड अंतरावरून अप्रतिम फटका मारला आणि अल्जीरियाचा गोलरक्षक लुका झिदानच्या (फ्रान्सचा माजी कर्णधार झिनेदिन झिदानचा मुलगा) हाताला लागून चेंडू गोलजाळीत गेला. त्यामुळे अर्जेंटिनाला आघाडी मिळाली. त्यानंतर त्यांनी सामन्यावर नियंत्रण राखले. उत्तरार्धात ६०व्या मिनिटाला ॲलेक्सिस मॅक ॲलिस्टरने लांबूनच गोलच्या दिशेने फटका मारला. यावेळी चेंडू पकडण्यात झिदान अपयशी ठरला. त्याच्या शरीराला लागून चेंडू रिबाउंड झाला आणि मेसीने जोरात धाव घेत गोल करण्याची संधी साधली.

मग ७६व्या मिनिटाला बदली खेळाडू निको गोन्झालेझच्या पासवर मेसीने गोलकक्षाबाहेरून अचूक फटका मारत विश्वचषक कारकीर्दीतील पहिली हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्यानंतर हात आकाशाकडे उंचावून आनंद साजरा केला. सामन्यातील ८०व्या मिनिटाला प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी मेसीला मैदानाबाहेर बोलावले, पण तोवर अर्जेंटिनाचा विजय निश्चित झाला होता.

दोन दशकांनंतरही जादू…

’ जर्मनी येथे २००६ साली वयाच्या १८व्या वर्षी विश्वचषक पदार्पण करणारा मेसी दोन दशकांनंतरही तितकाच धारदार दिसला.
’ मेसीने २००६च्या स्पर्धेत १६ जून रोजी बदली खेळाडू म्हणून मैदानात येताना एक गोल आणि एक गोलसाहाय्य केले होते.
’त्यानंतर २० वर्षांनी १६ जूनलाच त्याने विश्वचषक कारकीर्दीतील पहिली हॅट्ट्रिक साजरी केली. अर्जेंटिनासाठी हा त्याचा २००वा सामना ठरला.

पहिल्या गोलनंतर भावुक

पहिला गोल केल्यानंतर मेसी भावुक झाला. मात्र, यामागे फुटबॉलशी संबंधित कारण नसल्याचे त्याने सांगितले. सामन्याच्या १७व्या मिनिटाला मेसीने पहिला गोल केला. त्यानंतर सहकार्‍यांनी त्याच्यासह आनंद साजरा केला. याच वेळी मेसी आपल्या जर्सीने डोळे पुसताना दिसला. सामन्यानंतर याविषयी विचारले असता, ‘‘मी का रडलो? त्याचे कारण फुटबॉलशी अजिबात संबंधित नव्हते. गेले काही दिवस मी अत्यंत कठीण परिस्थितीतून गेलो. मात्र, संपूर्ण संघ आणि माझे सहकारी कायम माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी मला बळ दिले,’’ असे मेसीने सांगितले.

मेसीने विश्वचषक कारकीर्दीतील १६व्या गोलची नोंद केली. त्यामुळे त्याने विश्वचषक इतिहासात सर्वाधिक गोलच्या जर्मनीच्या मिरोस्लाव्ह कोसाच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. मेसीचे २७ सामन्यांत १६ गोल आहेत, तर क्लोसाने २४ सामन्यांत अशी कामगिरी केली होती. त्या खालोखाल ब्राझीलचा रोनाल्डो (१९ सामन्यांत १५ गोल), फ्रान्सचा किलियन एम्बापे (१५ सामन्यांत १४ गोल) आणि जर्मनीचे गेर्ड मुलर (१३ सामन्यांत १४ गोल) यांचा क्रमांक लागतो. यापैकी केवळ मेसी आणि एम्बापे हेच सक्रिय असल्याने यंदाच्या स्पर्धेत या दोघांमध्ये विक्रमासाठी चुरस पाहायला मिळेल.