न्यूयॉर्क : फ्रान्सचा कर्णधार आणि तारांकित आक्रमक किलियन एम्बापेच सलग दुसर्यांदा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ‘गोल्डन बूट’चा (सर्वाधिक गोल) मानकरी ठरला. विस्तारित स्वरूपाच्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू (गोल्डन बॉल), गोलरक्षक (गोल्डन ग्लोव्ह्ज), युवा खेळाडू अशी सर्व पारितोषिके विजेत्या स्पेनच्या खेळाडूंनीच पटकावली.
स्पर्धेत दहा गोल आणि तीन साहाय्य अशा कामगिरीसह एम्बापेने ‘गोल्डन बूट’चा मान मिळवला. विश्वचषक स्पर्धेत दोन वेळा हा मान मिळवणारा एम्बापे पहिला खेळाडू ठरला. २०२२च्या स्पर्धेतही एम्बापेने मेसीलाच मागे टाकून हा मान मिळवला होता. मेसीला हा पुरस्कार एकदाही मिळालेला नाही. यंदाच्या स्पर्धेत मेसी आठ गोलसह दुसर्या स्थानी राहिला.
रॉड्री सर्वोत्तम
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून स्पेनचा कर्णधार रॉड्रीची निवड झाली. त्याने एकही गोल किंवा गोलसाहाय्य केले नसले, तरी मध्यरक्षक म्हणून त्याचे नियंत्रण स्पेनसाठी निर्णायक ठरले. त्याने ९४ टक्के अचूकतेसह स्पर्धेत सर्वाधिक (७५३) पासेस पूर्ण केले. ‘फिफा’च्या आकडेवारीनुसार, तो १,८०३ वेळा खेळाच्या हालचालींमध्ये थेट सामील होता, जे या विश्वचषकातील इतर कोणत्याही खेळाडूच्या तुलनेत जवळपास २०० ने जास्त आहे. ‘‘दुखापतीमुळे आठ महिने खेळापासून दूर राहावे लागल्याचा काळ माझ्यासाठी कठीण होता. तुम्ही खाली पडलात, तर पुन्हा उभे राहू शकता. फक्त सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. माझ्या यशाचे हेच गमक आहे,’’ असे रॉड्री म्हणाला. मेसीला ‘सिल्व्हर बॉल’ आणि एम्बापेला ‘ब्रॉन्झ बॉल’ मिळाला.
कुबार्सी सरस
सर्वोत्तम कामगिरी करणार्या गोलरक्षकाचा पुरस्कार उनाय सिमॉनने मिळवला. त्याने आठपैकी सात सामन्यांत प्रतिस्पध्र्यांना एकही गोल करू दिला नाही. स्पेनच्या १९ वर्षीय पाऊ कुबार्सीने त्याचाच सहकारी लामिन यमालला मागे टाकत सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार पटकावला.
सामना समाप्तीनंतर खेळाडूंत झटापट
न्यूयॉर्क : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभव अर्जेंटिना संघाच्या खेळाडूंना पचवता आला नाही. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसी एकीकडे भावुक होऊन मैदानात शांत बसला होता, तर दुसरीकडे अर्जेंटिनाचे अन्य काही खेळाडू स्पेनच्या खेळाडूंवर हल्लाबोल करण्यात गुंग असल्याचे दिसून आले.
अर्जेंटिनाच्या खेळाडूंच्या या वर्तनाने मैदानावरील विजयोत्सवाला गालबोट लागले. आपल्या खेळाडूंना रोखण्यासाठी प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांची अक्षरश: धावपळ चालली होती. सामना संपल्याची अंतिम शिट्टी वाजल्यानंतर स्पेनचे खेळाडू जल्लोषात मैदानात धावले. मात्र, अर्जेंटिनाच्या काही खेळाडूंनी त्यांना धक्काबुक्की केली. हाणामारीपासून ते एकमेकांचा गळा पकडेपर्यंत या खेळाडूंची मजल गेली होती.
अर्जेंटिनाचा मध्यरक्षक लिआंड्रो पेरेडेस स्पेनच्या एरिक गार्सियाची मान पकडून त्याला ढकलताना दिसला. स्पेनचा बदली खेळाडू गावी याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, पेरेडेसने त्यालाही जमिनीवर ढकलून दिले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इतर खेळाडू आणि अर्जेंटिनाचे प्रशिक्षक स्कालोनी यांनी तातडीने धाव घेतली. त्यामुळे हे प्रकरण चिघळले नाही. पंचांनी पेरेडेसला ‘लाल कार्ड’ दाखवले.
स्पेनचा संघ जेव्हा विजेतेपदाचा चषक उंचावत होता, तेव्हा अर्जेंटिनाचे खेळाडू मंचाकडे पाठ फिरवून आपल्या चाहत्यांसमोर उभे राहिले होते. अर्जेंटिनाच्या खेळाडूंच्या या वर्तणुकीवर बरीच टीका झाली.
ट्रम्प, ‘हाफटाइम शो’ आणि अन्यही…
* विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती, मडोना, जस्टिन बीबर, शकिरा यांच्या आवाजाची भूरळ, अभिनेता टॉम क्रूझचे भाषण, आकाशातील रोषणाई याचीही चर्चा रंगली.
* अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या स्पर्धेतील थेट हस्तक्षेपाची चर्चा बरीच गाजली, पण त्यांनी कोणत्याच सामन्याला उपस्थिती लावली नाही. अंतिम सामन्याला मात्र मैदानावर घिरट्या घालणार्या हेलिकॉप्टर्सनी त्यांच्या उपस्थितीची पहिली जाणीव करून दिली.
* पारितोषिक सोहळ्यासाठी ट्रम्प आणि ‘फिफा’ अध्यक्ष जियानी इन्फान्टिनो विजयमंचावर आले तेव्हा प्रेक्षकांमधून त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच स्पेनला विश्वचषक दिल्यानंतर ट्रम्प बराच वेळ विजयमंचावरच थांबून राहिले. त्यामुळे स्पेनच्या संघाला चषक उंचावण्यापूर्वी काही सेकंद थांबावे लागले. * त्याआधी सामन्याच्या मध्यंतरात झालेला ‘हाफटाइम शो’ही चर्चेचा विषय ठरला. मडोना, शकिरा, जस्टिन बीबर, रॉबी विल्यम्स यांच्या संगीताचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक आपल्या जागीच बसून राहिले. विश्वचषक स्पर्धेत प्रथमच अशा सोहळ्यासाठी मध्यंतराचा वेळ वाढविण्यात आला.
