एपी, ईस्ट रदरफोर्ड
आपल्या गौरवशाली भूतकाळाला साजेसा भविष्यकाळ घडवण्याचा शोध घेणार्या पाच वेळच्या ब्राझीलला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत मोरोक्कोविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत राखता आला. स्पर्धेच्या इतिहासात २००२ नंतर विजेतेपदाच्या शोधात असलेल्या ब्राझीलला सामन्यात एका क्षणी मोरोक्कोने निश्चितपणे दबावाखाली ठेवले होते.
अत्यंत चुरशीने झालेल्या गट साखळीतील या सामन्यात व्हिनिशियस ज्युनियरने ३२व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर ब्राझीलला हा सामना बरोबरीत राखण्यात यश आले. ब्राझीलच्या खेळात त्यांचा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न दिसून आला, पण तो खेळ त्यांच्या पारंपरिक साम्बा शैलीला साजेसा नक्कीच नव्हता.
‘‘आम्ही खूप खराब सुरुवात केली,’’व्हिनिशियसची ही प्रतिक्रिया निश्चित बोलकी होती. ‘‘आम्हाला पुढे जायचे असेल, तर चेंडूवर नियंत्रण राखणे गरजेचे आहे. आम्हाला मैदानावर अधिक चांगल्या प्रकारे हालचाल करावी लागेल,’’असेही व्हिनिशियस म्हणाला. चार वर्षांपूर्वी उपांत्य फेरीत पोहोचलेल्या मोरोक्कोने पहिल्या ३० मिनिटांत १२ फटके मारले. सामन्याच्या २१ व्या मिनिटाला इस्माईल सायबारीने ब्राझीलचा गोलरक्षक ॲलिसन बेकरच्या डोक्यावरून चेंडू अचूक जाळ्यात धाडत मोरोक्कोला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती.
ब्राझीलच्या खेळाडूंमध्ये अजिबात ताळमेळ नव्हता. व्हिनिशियसच्या वैयक्तिक कौशल्यावरच त्यांना सामन्यात आव्हान राखता आले. एका गोलच्या पिछाडीनंतर डाव्या बाजूने व्हिनिशियसने ब्रुनो गुइमारेससोबत पासेसची देवाणघेवाण केली, नील एल आयनाउईला चकवत पुढे सरकला आणि मोरोक्कोचा गोलरक्षक यासिन बोनो याला चकवून उजव्या पायाने शानदार गोल केला. व्हिनिशियसने आपल्या ५०व्या सामन्यांत दहावा आंतरराष्ट्रीय गोल होता.
उजव्या पायाच्या दुखापतीतून सावरणारा ब्राझीलचा तारांकित आघाडीपटू नेमार या सामन्यात खेळू शकला नाही. ल्युकास पॅकेटा याने रॉजर इबानेझकडून आलेला शॉर्ट पास गमावल्यानंतर चेंडू बिलाल एल खानौसकडे गेला आणि तेथून तो नौसेर माझरावीकडे पोहोचला, ज्याने मध्यभागी असलेल्या ब्राहिम डियाझकडे चेंडू पास केला. डियाझच्या थ्रू पासने गॅब्रिएल मॅगाल्हेस आणि मा्क्विवनोसला चकवले. सायबारीने चेंडूवर ताबा मिळवला. ॲलिसन बेकर गोलपोस्ट सोडून पुढे आला आणि सायबारीने चेंडूला हलकासा स्पर्श करत गोलजाळीची दिशा दिली. व्हिनिशियसप्रमाणे सायबारीचादेखील हा दहावा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला.
ब्राझीलच्या चाहत्यांची गर्दी
’मेटलाइफ स्टेडियमवरील ८०,६६३ प्रेक्षकांमध्ये ब्राझीलच्या पिवळ्या जर्सीतील चाहत्यांचाच दबदबा होता. चाहत्यांना पेले यांच्या काळातील आक्रमक आणि मनोरंजक खेळाची अपेक्षा होती, परंतु व्हिनिशियसने गोल करेपर्यंत स्टेडियममधील चाहते शांत होते.
’प्रथमच होणार्या ४८ देशांच्या या विस्तारित विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच फेरीत ‘फिफा’ क्रमवारीतील पहिल्या दहामधील संघात होणारा हा एकमेव सामना होता. ब्राझील सहाव्या, तर मोरोक्को सातव्या क्रमांकावर आहेत.
’त्यामुळेच या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. आम्ही धीर सोडता कामा नये. पहिला सामना जिंकून कोणी विश्वचषक जिंकत नाही, असे ब्राझीलचे प्रशिक्षक ॲन्सेलोटी म्हणाले.
