नवी दिल्ली : प्रतिष्ठेच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला काही दिवस शिल्लक असताना भारतीय चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) आणि ‘झी’ समूह यांच्यात भारतातील प्रक्षेपण हक्कांसंदर्भात करार झाला. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण झी समूहाच्या नव्या ‘युनाइट ८ स्पोर्ट्स’ वाहिनीवर, तसेच ‘झी ५’ या डिजिटल मंचावर उपलब्ध होणार आहे.

हा करार यंदाच्या विश्वचषकापुरता मर्यादित नसून, २०३४ पर्यंतच्या सर्व मोठ्या ‘फिफा’ स्पर्धांच्या भारतातील प्रक्षेपण हक्कांचाही त्यात समावेश आहे. यंदाची विश्वचषक स्पर्धा ११ जून ते १९ जुलै या कालावधीत अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे संयुक्तपणे आयोजित करण्यात येणार आहे. तर, २०३० मधील शताब्दी विश्वचषकाचे मुख्य सामने मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेन येथे होतील. याशिवाय स्पर्धेच्या शंभराव्या वर्षानिमित्त काही विशेष सामने उरुग्वे, अर्जेंटिना आणि पॅराग्वे येथे खेळवले जाणार आहेत. तसेच २०२७ मध्ये महिलांची विश्वचषक स्पर्धाही रंगणार आहे. 

‘‘भारतातील वाढत्या फुटबॉलप्रेमींपर्यंत जागतिक दर्जाच्या स्पर्धा पोहोचवणे आणि फुटबॉलचा प्रसार अधिक व्यापक करणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे. सामन्यांसह विशेष कार्यक्रम आणि विश्लेषण विविध भारतीय भाषांमध्ये सादर केले जाणार आहेत,’’ असे ‘फिफा’ आणि ‘झी’ यांनी एका संयुक्त निवेदनाद्वारे जाहीर केले.

या कराराअंतर्गत पुरुष, महिला आणि युवा गटांतील एकूण ३९ ‘फिफा’ स्पर्धांचे प्रक्षेपण झी समूहाकडून करण्यात येणार आहे. यामध्ये १७ वर्षांखालील व २० वर्षांखालील विश्वचषक, महिला युवा विश्वचषक, फुटबॉल विश्वचषक आणि आंतरखंडीय स्पर्धांचाही समावेश आहे.

किंमत कमी का?

‘फिफा’ला भारतातील प्रक्षेपण हक्कांसाठी जवळपास १० कोटी डॉलर किंमत अपेक्षित होती. मात्र, सामने अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये होणार असल्याने, भारतात ते मध्यरात्री किंवा पहाटे (१२ ते ६ वाजताच्या दरम्यान) दिसतील. यामुळे जाहिरातींमधून कमाई करणे कठीण असल्याने अनेक बड्या कंपन्यांनी जास्त बोली लावली नाही. परिणामी, ‘फिफा’ला आपली किंमत जवळपास ६५ टक्क्यांनी कमी करावी लागली. 

अंदाजे ३.५० कोटी डॉलरचा व्यवहार

या कराराची अधिकृत आणि नेमकी किंमत ‘फिफा’ किंवा ‘झी’ समूहाने संयुक्त निवेदनात जाहीर केली नसली, तरी सूत्रांच्या माहितीनुसार अंदाजे ३ ते ३.५० कोटी डॉलरना हा करार झाल्याचे समजते.