बाद फेरी गाठण्याच्या दिशेने इक्वेडोरने होन्डुरासवर विजयासह दमदार पाऊल टाकले. इनर व्हॅलेन्सिआ इक्वेडोरच्या विजयाचा शिल्पकार ठरला. इक्वेडोरच्या २-१ विजयातील दोन्ही गोल व्हॅलेन्सिआनेच केले.
कालरे कोस्टलीने ३१व्या मिनिटाला गोल करत होन्डुरासचे खाते उघडले. विश्वचषकात पहिलावहिला विजय साजरा करण्यासाठी होन्डुरासचा संघ उत्सुक होता. मात्र केवळ तीनच मिनिटांत व्हॅलेन्सिआने जवळच्या अंतरावरून गोल करत बरोबरी करून दिली. या गोलसह व्हॅलेन्सिआने स्पर्धेतल्या सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत करीम बेन्झेमा, रॉबिन व्हॅन पर्सी, थॉमस म्युलर आणि आर्येन रॉबेन यांची बरोबरी केली. बरोबरीची कोंडी झालेली असताना व्हॅलेन्सिआने ६५व्या मिनिटाला आणखी एक गोल करत इक्वेडोरला आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर खेळाचा वेग कमी करत चेंडूवर नियंत्रण ठेवण्यावर इक्वेडोरने भर दिली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. इ गटात फ्रान्स अव्वल स्थानी असून, प्रत्येकी तीन गुणांसह स्वित्र्झलड आणि इक्वेडोर दुसऱ्या स्थानी आहेत, मात्र गोल फरकाच्या मुद्दय़ावर इक्वेडोर आघाडीवर आहे. दोन्ही लढती गमावूनही होन्डुरासचा संघ बाद फेरीत स्थान मिळवू शकतो. स्वित्र्झलडवर दणदणीत विजय आणि फ्रान्सने इक्वेडोरवर मात केल्यास होन्डुरास बाद फेरीत पोहोचू शकतो.