Mexico Fans Viral Video: फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे फुटबॉल या खेळाला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या सर्वाधिक आहे. फुटबॉल चाहते आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात, याचं उदाहरण आपण अनेकदा पाहिलं आहे. मैदानात अनेकदा चाहत्यांकडून विरोधी संघातील खेळाडूंवर बॉटलने हल्ला करण्यात आला आहे. यासह अनेकदा विरोधी संघाला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांवर हल्ला केला जातो. पण फिफा वर्ल्डकप स्पर्धेत वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. या स्पर्धेतील राऊंड ऑफ १६ फेरीतील सामन्यात इंग्लंड आणि मेक्सिको हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्याआधी मेक्सिकोच्या चाहत्यांनी इंग्लंडच्या हॉटेलबाहेर धिंगाणा केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मेक्सिको शहरातील एज्टेका स्टेडियममध्ये यजमान मेक्सिको आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये फिफा वर्ल्डकप स्पर्धेत राऊंड ऑफ १६ फेरीतील सामना खेळवला जाणार आहे. हा सामना सामना रविवारी रात्री (भारतात सोमवारी सकाळी ५ वाजता) खेळवला जाणार आहे. मेक्सिको संघासाठी हा सामना अतिशय खास असणार आहे. कारण मेक्सिकोला हा सामना जिंकून क्वार्टरफायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेकडून आधीच खबरदारी घेण्यात आली होती. मेक्सिकोचे चाहते इंग्लंडच्या संघाची एकाग्रता भंग करण्यासाठी काय करू शकतात याची आधीपासून कल्पना असल्यानं मेक्सिकोमध्ये इंग्लंडचा संघ कुठल्या हॉटेलमध्ये थांबला आहे, ही माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. पण मेक्सिकोच्या चाहत्यांना ही माहिती मिळाली आणि त्यांनी रात्रभर हॉटेलबाहेर धिंगाणा केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हॉटेलबाहेर पोलिस तैनात करण्यात आले होते.

मेक्सिकोच्या चाहत्यांचा हॉटेलबाहेर धिंगाणा

मेक्सिको आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना होणार, यात काहीच शंका नाही. कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. मेक्सिकोचे चाहते, आपला संघाला सपोर्ट कारणासाठी तुफान गर्दी करतील. पण खेळाडू मैदानात उतरण्याआधीच मेक्सिकोच्या चाहत्यांनी आपल्या संघाला जिंकून देण्याचे प्रयत्न केले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हजारो चाहते, ढोल, लाऊड स्पीकर आणि फटाके घेऊन हॉटेलबाहेर पोहोचले. सर्वांनी रात्रभर मिळून मद्यपान करून धिंगाणा घातला. जोर जोरात घोषणा दिल्या. मेक्सिकोच्या चाहत्यांनी इंग्लंडच्या संघाला त्रास देण्याचा पूर्ण प्रयत्न केला.