Erling Haaland Emotional Letter: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत सध्या एकच नाव सध्या तुफान चर्चेत आहे, ते म्हणजे अर्लिंग हालंड. नॉर्वेला क्वार्टरफायनलमध्ये पोहोचवण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली आहे. मैदानावर दमदार कामगिरी करुन त्याने चाहत्यांची मन जिंकलं आहे. यासह मैदानाबाहेरही त्याने असं काही केलं आहे, जे पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. अर्लिंग हालंडने रस्ते अपघातात आपला जीव गमावणाऱ्या ६ वर्षीय चाहत्याच्या कुटुंबियांना भावुक करणारं पत्र लिहिलं आहे. यासह खेळाडूंची ऑटोग्राफ असलेली जर्सी देखील दिली आहे.
माध्यमातील वृत्तानुसार,अर्लिंग हालंडचा ६ वर्षीय चाहता डेनिस याचे रस्ते अपघातात निधन झाले. डेनिस हालंडचा सर्वात मोठा चाहता होता. ही बातमी मिळताच, अर्लिंग हालंडने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याच्या कुटुंबियांसाठी भावुक पत्र लिहिलं. यासह नॉर्वेच्या खेळाडूंची ऑटोग्राफ असलेली जर्सी देखील पाठवली. या पत्राचा आणि जर्सीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अर्लिंग हालंडने पत्रात काय लिहिलं?
हालंड आणि त्याच्या कुटुंबाने या पत्रात लिहिले की, “प्रिय माता-पिता मॅथियास आणि तिरिल. डेनिसच्या निधनाबद्दल आम्हा सर्वांच्या वतीने तुमच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना. आम्ही स्वत: देखील माता- पिता आणि भाऊ बहीण आहोत. त्यामुळे तुम्ही सध्या कोणत्या वेदनेतून जात असाल, याची आम्ही कल्पनाही करु शकत नाही. या कठीण काळात आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. आम्हाला समजलं की, डेनिसचे फुटबॉलवर खूप प्रेम होते. त्यामुळे आम्ही ही भेट तुम्हाला पाठवू इच्छितो.” हालंड कुटुंबाने पाठवलेल्या या पत्राचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे पत्र आणि नॉर्वेच्या खेळाडूंची ऑटोग्राफ असलेली जर्सी मिळताच डेनिसच्या वडिलांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे. यासह या पोस्टवर भावुक करणारं कॅप्शन लिहिलं आहे. त्यांनी लिहिले की, “हा आमच्या आयुष्यातील सर्वात अनपेक्षित क्षणांपैकी एक क्षण होता. जेव्हा आम्हाला अर्लिंग हालंड आणि त्याच्या कुटुंबाकडून नॉर्वे राष्ट्रीय संघाची ऑटोग्राफ केलेली जर्सी आणि स्वत: आपल्या हाताने लिहिलेले पत्र मिळाले,हे पाहून आमच्या अंगावर काटा आला. आज जर डेनिस आमच्यात असता, तर त्याला या गोष्टीचा खूप अभिमान वाटला असता. अर्लिंग, तू त्याचा सर्वात मोठा आदर्श होतास. तुझे मनापासून खूप खूप धन्यवाद.”
