Who Is Ferran Torres: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला. हा सामना एक्स्ट्रा टाईममध्ये गेला. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत रंगली. १२० मिनिटे पार पडलेल्या या सामन्यात एकच खेळाडू तुफान चर्चेत राहिला, तो म्हणजे फेरान टॉरेस. स्पेनसाठी विंग पोझिशनला खेळणारा खेळाडू. ज्या सामन्यात अनेक दिग्गज खेळाडू मागे पडले, त्या सामन्यात टॉरेस एकमेव गोल करून हिरो बनला आणि स्पेनला १-० ने वर्ल्डकप जिंकून दिला. फेरान टॉरेसचा फुटबॉलचा प्रवास कसा सुरू झाला, हा किस्सा खूप कमी लोकांना माहीत आहे.

या सामन्यात स्पेन आणि अर्जेंटिनाचे खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरत होते. त्यावेळी २६ वर्षीय टॉरेसने दमदार गोल केला आणि सामना स्पेनच्या बाजूने फिरवला. एक्स्ट्रा टाईमच्या १०६ व्या मिनिटाला, फेरान टॉरेसने दमदार किक मारली आणि या सामन्यातील पहिला गोल केला. या संपूर्ण सामन्यातील एकमेव गोल ठरला. मुख्य बाब अशी आहे की, टॉरेसला या सामन्यातील सुरुवातीच्या प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. त्यानंतर सामन्यातील ६१ व्या मिनिटाला त्याला मैदानात उतरण्याची संधी मिळाली. सुरुवातीला हा निर्णय फसला, पण शेवटी त्याने मॅनेजरचा निर्णय योग्य ठरवला आणि स्पेनला दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकून दिला.

फेरान टॉरेसने वयाच्या ६ व्या वर्षी फुटबॉल खेळायला सुरुवात केली. टॉरेसचा जन्म स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथील एका छोट्याशा गावात झाला. त्याचा जन्म सामान्य कुटुंबात झाला होता. जिथे त्याचा सांभाळ त्याच्या आईनेच केला. टॉरेसला फुटबॉल या खेळाकडे आकर्षित करण्यात त्याच्या आजोबांचा मोलाचा वाटा आहे. एका मुलाखतीत टॉरेसने सांगितले होते की, वयाच्या ६ व्या वर्षी फुटबॉल खेळायला सुरुवात केल्यानंतर, त्याच्या आजोबांनी त्याला या खेळातील बारकावे समजावून सागिंतले होते. टॉरेस आणि त्याचे आजोबा दोघेही घराच्या अंगणात तासनतास फुटबॉल खेळायचे.

पाळीव कुत्र्यांसोबत फुटबॉलचा सराव

टॉरेसने सांगितलेला आणखी एक किस्सा तुफान चर्चेत आहे. तो म्हणजे, आजोंबासोबत सराव करण्यासह तो आपल्या पाळीव कुत्र्यांसोबतही फुटबॉलचा सराव करायचा. तो कुत्र्यांना गोलकीपर बनवायचा आणि गोल करण्याचा प्रयत्न करायचा. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, गोलकीपरपेक्षा कुंत्र्यासमोर गोल करणं जास्त अवघड आहे. कुत्र्यांसोबत केलेल्या या अनोख्या सरावानेच त्याला एक उत्कृष्ट ‘स्ट्रायकर’ बनण्यास मदत केली