वृत्तसंस्था, ईस्ट रुदरफोर्ड : पूर्वार्धासह उत्तरार्धातील सुरुवातीच्या संथ खेळानंतर वेगवान झालेल्या अखेरच्या टप्प्यात किलियन एम्बापेने केलेल्या दोन गोलमुळे फ्रान्स संघाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील मोहिमेस विजयी सुरुवात केली. सलामीच्या लढतीत फ्रान्सने सेनेगलचे आव्हान ३-१ असे परतवून लावले. फ्रान्सच्या या विजयाला एम्बापेच्या विक्रमी गोलच्या कामगिरीची जोड लाभली.

एम्बापेने दोन गोल करताना महान फुटबॉलपटू पेले यांना मागे टाकले आणि आपल्या विश्वचषक कारकीर्दीतील गोलची संख्या १४ वर नेली. गोल केल्यानंतर त्याने बासरी वाजवल्यासारखी कृती करत आनंद साजरा केला. कतारमधील गेल्या विश्वचषक स्पर्धेत एम्बापेने सर्वाधिक आठ गोल केले होते. यात अंतिम लढतीतील हॅटट्रकिचाही समावेश होता. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोलच्या यादीत एम्बापे आता तिसर्‍या स्थानावर असला तरी, फ्रान्सकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय (५८) गोल त्याच्या नावे झाले आहेत. त्याने ऑलिव्हिएर जिरुडचा (५७ गोल) विक्रम मोडला.

वेगवान उत्तरार्ध

सामन्याच्या पहिल्या सत्रात गोलफलक कोरा असताना एम्बापेने सर्वांत कमी म्हणजे फक्त १४ वेळा चेंडूला स्पर्श केला होता. मात्र, उत्तरार्धात ६६व्या मिनिटाला त्यानेच फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. मायकल ओलिसेच्या पासवर त्याने सहा यार्डावरून थेट किक मारत सेनेगलचा गोलरक्षक एडुआर्ड मेंडीला चकवले. त्यानंतर बदली खेळाडू ब्रॅडली बार्कोलाने मैदानात आल्यावर अवघ्या दोन मिनिटांत सामन्याच्या ८२व्या मिनिटाला फ्रान्सची आघाडी दुप्पट केली. त्यानंतर भरपाई वेळेतील पाचव्या मिनिटाला इब्राहिम एम्बायेने सेनेगलचे खाते उघडले. मात्र, या गोलच्या अवघ्या ६८व्या सेकंदांनी एम्बापेने ३० यार्डावरून उजव्या पायाच्या जबरदस्त किकने फ्रान्ससाठी तिसरा गोल केला. फ्रान्सचा बचावपटू विल्यम सलिबा याने या गोलचे ‘अविश्वसनीय’ असे वर्णन केले.

दोन्ही सत्रांतील विरोधाभास

पहिल्या सत्रात सेनेगलने फ्रान्सवर वर्चस्व राखले होते. गोलपोस्टच्या दिशेने फ्रान्सच्या (१) तुलनेत सेनेगलने (५) अधिक फटके मारले. सेनेगलचा आघाडीपटू निकोलस जॅक्सनने २५व्या मिनिटाला मारलेला फटका गोलपोस्टला लागून परतला आणि फ्रान्सचा गोलरक्षक माईक मेनयॉनच्या टाचेला लागून बाहेर गेला. मात्र, दुसर्‍या सत्रात मायकल ओलिसेने उजव्या बाजूने खेळायला सुरुवात करताच फ्रान्सने सामन्यावर पकड घेतली. उत्तरार्धात सेनेगलला गोलपोस्टच्या दिशेने केवळ एकच फटका मारता आला, तुलनेत फ्रान्सने १० फटके मारत पूर्ण वर्चस्व राखले.

जल्लोषाची वचनपूर्ती

स्पर्धेपूर्वी एका वाहिनीला एम्बापेने मुलाखत दिली. त्यावेळी मुलाखत घेणारा प्रसिद्ध अभिनेता जेम्स कॉर्डन याने विश्वचषक स्पर्धेत पुढील गोल केल्यावर एम्बापेला बासरी वाजवल्यासारखी कृती करून आनंद व्यक्त करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. एम्बापेने देखील तशी कृती करण्याचे वचन दिले होते. त्याने सेनेगलविरुद्ध पहिला गोल केल्यावर मैदानाच्या कोपर्‍यात जाऊन जल्लोष करताना दोन्ही हात ओठांजवळ नेत काही सेकंद हवेत बासरी वाजवल्यासारखे केले.

कमी झालेले तिकिट दर : या सामन्याच्या दोन तास आधी ‘फिफा’च्या पुनर्विक्री संकेतस्थळावर सामन्याच्या तिकिटांचा दर ६९ डॉलरपर्यंत खाली आला होता. डिसेंबरला तिकिटविक्री सुरू झाली तेव्हा याच तिकिटांचा दर २२० ते ६२० डॉलर इतका होता.