scorecardresearch

FIFA World Cup 2022: जर्मनीला विजय अनिवार्य!; आज मध्यरात्री तुल्यबळ स्पेनशी सामना; मध्यरक्षकांमधील द्वंद्वावर नजर

FIFA World Cup: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आली होती, त्यावेळी स्पेन आणि जर्मनी या माजी विजेत्यांमधील साखळी लढतीने सर्वाचे लक्ष वेधले होते.

FIFA World Cup 2022: जर्मनीला विजय अनिवार्य!; आज मध्यरात्री तुल्यबळ स्पेनशी सामना; मध्यरक्षकांमधील द्वंद्वावर नजर

वृत्तसंस्था, दोहा : ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आली होती, त्यावेळी स्पेन आणि जर्मनी या माजी विजेत्यांमधील साखळी लढतीने सर्वाचे लक्ष वेधले होते. युरोपातील हे दोन तुल्यबळ संघ रविवारी मध्यरात्री एल बाएत स्टेडियममध्ये समोरासमोर येणार असून जर्मनीला विजय अनिवार्य आहे.

चार वेळच्या विश्वविजेत्या जर्मनीला यंदाही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, सलामीच्या लढतीत जर्मनीला जपानने १-२ असा पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे जर्मनीसाठी स्पेनविरुद्ध विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. रविवारी इ-गटातील अन्य लढतीत जपान आणि कोस्टा रिका हे संघ आमनेसामने येतील. हा सामना बरोबरीत सुटला आणि स्पेनविरुद्ध जर्मनीचा पराभव झाला, तर जर्मनीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

दुसरीकडे, स्पेनचे सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य असेल. त्यांनी सलामीच्या लढतीत कोस्टा रिकाचा ७-० असा धुव्वा उडवला होता. स्पेनच्या संघात बऱ्याच युवा खेळाडूंचा समावेश असल्याने संभाव्य विजेत्यांच्या यादीत त्यांना फार वरचे स्थान मिळालेले नाही. मात्र, जर्मनीला नमवून आपली दावेदारी सिद्ध करण्याची स्पेनला संधी आहे. जर्मनीला गेल्या आठ वर्षांत स्पेनविरुद्ध सामना जिंकता आलेला नाही. दोन वर्षांपूर्वी नेशन्स लीगच्या सामन्यात जर्मनीने स्पेनकडून ०-६ असा लाजिरवाणा पराभव पत्करला होता. त्यामुळे या सामन्यात आपला खेळ उंचावण्यासाठी जर्मनीच्या संघावर दडपण असेल.

जर्मनीला स्पेनविरुद्ध विजय मिळवायचा झाल्यास आघाडीपटू काय हावेट्झने चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. क्लब फुटबॉलमध्ये चेल्सीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हावेट्झच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. या सामन्यात जर्मनी आणि स्पेनच्या मध्यरक्षकांमधील द्वंद्व पाहण्यासारखे असेल. जर्मनीच्या संघात इल्काय गुंडोगन आणि जॉश्वा किमिच असे, तर स्पेनच्या संघात कर्णधार सर्जिओ बुसकेट्स, गावी आणि प्रेडी असे दर्जेदार मध्यरक्षक आहेत. त्यांच्या कामगिरीवरून या सामन्याचा निकाल ठरू शकेल.

संभाव्य संघ

स्पेन : उनाय सिमॉन; सेजार अ‍ॅझपिलेक्वेटा, रॉड्री, एमरिक लॅपोर्ट, जॉर्डी अल्बा; गावी, सर्जिओ बुसकेट्स, प्रेडी; फेरान टोरेस, मार्को असेन्सिओ, डॅनी ओल्मो (संघाची रचना : ४-३-३)

संभाव्य संघ

जर्मनी : मॅन्युएल नॉयर; निकलस सुले, अ‍ॅन्टोनियो रुडिगा, निको श्लोटरबेक, डेव्हिड राउम; जॉश्वा किमिच, इल्काय गुंडोगन; सर्ज गनाब्री, थॉमस मुलर, जमाल मुसिआला; काय हावेट्झ (संघाची रचना : ४-२-३-१)

  • वेळ : मध्यरात्री १२.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, १ एचडी, स्पोर्टस १८ खेल, जिओ सिनेमा

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या