पुढील महिन्यात सुरू होणार्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या भारतातील प्रक्षेपणाचा तिढा अद्याप कायम आहे. तो सोडविण्यासाठी ‘फिफा’चे माध्यम हक्क अधिकारी भारताच्या दौर्यावर आल्याचे तीन सूत्रांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले. भारतातील फुटबॉलप्रेमींना यंदाचा विश्वचषक पाहता येणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. प्रसारण हक्कांच्या किमतीवरून ‘फिफा’ आणि भारतीय मीडिया कंपन्यांमध्ये तोडगा निघालेला नाही. गेल्या आठवड्यात चीनमध्येही अशीच परिस्थिती होती. मात्र, चीन मीडिया ग्रुपने करार करून तिथला तिढा सोडवला.
‘फिफा’च्या योजनांची माहिती असलेल्या तीन सूत्रांनी सांगितले की, ‘‘फिफाचे माध्यम हक्क अधिकारी भारतात विविध भागधारकांशी चर्चा करत आहेत. मात्र, ते कोणाला भेटत आहेत आणि नेमका त्यांचा दौरा कशासाठी आहे, याचा तपशील स्पष्ट झालेला नाही.’’ ‘‘जगातील १८० हून अधिक प्रदेशांमध्ये प्रसारण करार पूर्ण झाले आहेत. भारतातही चर्चा सुरू असून त्या सध्या गोपनीय ठेवण्यात आल्या आहेत,’’ असे ‘फिफा’ने वृत्तसंस्थेला सांगितले.
भारतातील सर्वांत मोठी मीडिया कंपनी रिलायन्स-डिस्ने आणि ‘फिफा’ यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. सोनी या आणखी एका मोठ्या कंपनीने बोली लावण्यापासून माघार घेतली आहे, अशी माहिती मिळते आहे. रिलायन्स-डिस्नेने ‘फिफा’च्या प्रक्षेपण हक्कांसाठी दोन कोटी डॉलर देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु ‘फिफा’ने सुरुवातीला १० कोटी डॉलरची मागणी केली, ज्यामुळे मतभेद निर्माण झाले. ‘फिफा’ने अखेरीस किमान सहा कोटी डॉलरच्या आसपासची मागणी केल्याचे समजते.
‘फिफा’ची रिलायन्स-डिस्नेबरोबर बैठक होत आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सच्या नेतृत्वाखालील या उपक्रमाने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. विश्वचषक ११ जून रोजी सुरू होणार आहे, त्यामुळे कराराला अंतिम स्वरूप देण्यासह प्रसारणाच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि जाहिरातींची विक्री करण्यासाठी फक्त तीन आठवडे शिल्लक आहेत.
