वृत्तसंस्था, लॉस एंजलिस : अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष अधिकृतपणे थांबला असला, तरी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील इराणचा सहभाग असलेल्या सामन्यात मोठा तणाव कायम राहिला. ‘फिफा’ने नाकारलेली विनंती, देशांतर्गत राजकीय विरोध अशा प्रतिकूल परिस्थितीतही इराणचा संघ विश्वचषकात खेळण्यासाठी उतरला आणि आपल्या मोहिमेची सुरुवात कमालीच्या जिद्दीने केली. सोमवारी रात्री झालेल्या अटीतटीच्या सामन्यात दोनदा पिछाडीवरून पुनरागमन करताना इराणने न्यूझीलंडला २-२ असे बरोबरीवर रोखले. सामन्यापूर्वी अनिवासी इराणी चाहत्यांनी निदर्शने करत देशातील सरकारला विरोधही दर्शवला.

इराणकडून रामिन रेझायान याने स्वत: एक गोल (३२व्या मिनिटाला) केला आणि मोहेब्बीच्या गोलसाठी (६४व्या मि.) सुंदर पास (असिस्ट) दिला. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून इराणी संघाचा विश्वचषक प्रवास प्रचंड उलथापालथीचा ठरला आहे. इराणची तिन्ही साखळी सामने अमेरिकेबाहेर हलवण्याची विनंती ‘फिफा’ने फेटाळली. यानंतरही इराणने स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. लॉस एंजलिस येथे झालेल्या सामन्यात इराणला चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. न्यूझीलंडसाठी दोन्ही गोल एलाया जस्टने (सातव्या आणि ५५व्या मि.) केले.

प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा

‘टीम मेल्ली’ या टोपण नावाने ओळखल्या जाणार्‍या इराण संघाने तणावग्रस्त पार्श्वभूमीवर विश्वचषक मोहिमेची सुरुवात लॉस एंजलिस जवळील सोफाय स्टेडियमवर शानदार बरोबरीने केली. या भागात इराणी लोकांची जगभरातील (मायदेश वगळता) सर्वांत मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे मैदानात इराणला पाठिंबा देणारा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्याच वेळी स्टेडियमबाहेर शेकडो इराणी-अमेरिकन नागरिक सरकारचा निषेध करत होते, तर अनिवासी इराणी चाहत्यांनी राष्ट्रगीतादरम्यान मैदानाकडे पाठ फिरवून आपला निषेध नोंदवला. मात्र, सामना सुरू होताच हा सर्व विरोध, निषेध मावळला आणि जवळपास सर्वच चाहत्यांनी इराणी खेळाडूंना मनापासून पाठिंबा दिला.

‘ऑल व्हाइट्स’ अपयशी

क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघ ‘ब्लॅक कॅप्स’ नावाने परिचित आहे. फुटबॉलमध्ये मात्र ‘ऑल व्हाइट्स’ नावाने ओळखल्या जाणार्‍या न्यूझीलंडने सामन्यात दोन वेळा आघाडी घेतली. मात्र, इराणने दोन्ही वेळा चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे न्यूझीलंड संघ विश्वचषक इतिहासातील पहिला विजय मिळवण्यापासून वंचित राहिला. यानंतरही न्यूझीलंडने आपल्या गेल्या दोन विश्वचषक मोहिमांमधील एकूण गोलसंख्येची बरोबरी केली.
गोलसाठी ३२ मिनिटे
एलाया जस्टने सातव्या आणि उत्तरार्धात सामन्याच्या ५४व्या मिनिटाला गोल करत न्यूझीलंडला आघाडीवर नेले होते. दोन्ही वेळा संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू आणि कर्णधार ख्रिस वूडने त्याला निर्णायक पास दिला. मात्र, उंचपुर्‍या जिद्दी इराणी खेळाडूंनी सामन्यात बरोबरी साधण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे त्यांचे दोन्ही गोलमधील अंतर ३२ मिनिटांचे होते. पूर्वार्धात ३२व्या मिनिटाला रेझायान याने आपल्या बूटच्या बाहेरील बाजूने चेंडू टोलावत अप्रतिम गोल केला. तर दुसरा गोल ३२ मिनिटांनी म्हणजे ६४व्या मिनिटाला झाला. यावेळी रेझायान याने दिलेल्या अचूक पासवर मोहेब्बीने उत्कृष्ट हेडर करत गोल केला.

इराणची न्यूझीलंडशी बरोबरी; चाहत्यांची निदर्शने रेझायानचे वक्तव्य, मोहेब्बीच्या कृतीने वाद युद्धाच्या पार्श्वभूमीवर या सामन्याला खेळातील कौशल्यपेक्षा राजकीय वलयच अधिक होते.त्याचे पडसाद सामन्यात आणि सामन्यानंतरही पाहायला मिळाले.बरोबरी साधणारा दुसरा गोल केल्यावर इराणच्या मोहम्मद मोहेब्बी याने दोन बोटे हवेत उंचावून बंदुकीतून गोळी झाडल्यासारखा इशारा करत जल्लोष केला. त्याच्या या कृतीने वाद निर्माण झाला.

त्याच वेळी अनिवासी इराणी चाहत्यांच्या राष्ट्रगीताला विरोध करण्याच्या कृतीविषयी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रेझायानने दिलेले उत्तरही असेच वादग्रस्त ठरत आहे. ‘‘हा आमचा वैयक्तिक विषय असून आम्ही तो सोडवू, तुम्ही काळजी करू नका,’’ असे उत्तर त्याने पत्रकारांना दिले.

सामन्यानंतर त्वरित अमेरिका सोडण्याचे इराण संघाला आदेश

’ इंगलवूड : न्यूझीलंडविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवल्यनंतर इराणच्या संघाला तातडीने अमेरिका सोडण्याचा आदेश देण्यात आले. युद्धसमाप्तीच्या घोषणेनंतरही असा आदेश काढण्यात आल्यामुळे एकूणच अमेरिकेच्या धोरणाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ’ इराण संघाचे प्रशिक्षक अमीर घालेनोई यांनी सामना संपल्यावर काही तासांतच आम्हाला अमेरिका सोडून मेक्सिकोत परतण्याचा आदेश देण्यात आल्याचा दावा केला. मात्र, हा आदेश नेमका कुणी दिला याचा स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला नाही. पहिल्या सामन्यानंतर खेळाडूंचा थकवा जाण्यासाठी इराण संघ कॅलिफोर्नियात मुक्काम करण्याचा विचार करत होता. मात्र, सामना संपतानाच सर्वांना अमेरिका सोडण्याचा आदेश देण्यात आला.

’ ‘‘आम्हाला थकवा घालवण्यासाठी थोडा वेळही दिला नाही. लगेच विमानात बसवून तिहुआनाला परत पाठवले जात आहे. आमच्या खेळाडूंना येथील तापमानाशी जुळवून घेता आले नाही. अनेक खेळाडूंना पायात गोळे येण्याचा किंवा स्नायू आखडण्याचा त्रास सहन करावा लागला,’’ असे घालेनोई म्हणाले.

भारतीय वंशाच्या सरप्रीतचा सहभाग

विश्वचषक स्पर्धेत सामना सुरू करणार्‍या ११ खेळाडूंत (स्टार्टिंग इलेव्हन) स्थान मिळवणारा न्यूझीलंडचा मध्यरक्षक सरप्रीत सिंग भारतीय वंशाचा पहिला फुटबॉलपटू ठरला. सरप्रीतचे आई-वडील मूळचे पंजाबचे असले, तरी व्यवसायासाठी ते ऑकलंडमध्ये स्थायिक झाले. फुटबॉलशी नाते जोडल्यावर सरप्रीत २०१८ मध्ये मुंबईत आंतरखंडीय चषक स्पर्धेत न्यूझीलंडच्या २३ वर्षांखालील संघाकडून खेळला होता. या स्पर्धेत त्याने केनियाविरुद्ध गोल केला, तर भारताविरुद्धच्या २-१ विजयात दोन्ही गोलसाठी त्याचे साहाय्य होते. त्यानंतर २०१९ मध्ये तो जर्मनीत बायर्न म्युनिककडून बुंडेसलिगामध्ये खेळला. न्यूझीलंडकडून संघात निवड झाल्यावर पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत तो इराणविरुद्ध संपूर्ण ९० मिनिटे मैदानावर होता.