मोठा संघ म्हणून प्रसिद्धी नाही, वलयांकित खेळाडूंची फौज नाही. विश्वविजेतेपदाच्या संभाव्य दावेदारांमध्येही त्यांचे नाव अभावानेच सापडते. मात्र असे सगळे असले तरी खणखणीत कामगिरीच्या जोरावर फ्रान्सने बाद फेरीत धडक मारण्याचे उद्दिष्ट साध्य करून दाखवले. जर्मनी, स्पेन, ब्राझील, नेदरलँड्स या संघाच्या आगमनाची, त्यांच्या सरावाची, खेळाडूंच्या राहणीमानाची तपशीलवार चर्चा होते. फ्रान्सच्या
बाबतीत हे काहीच नाही. तरीही शांतपणे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत त्यांनी स्वित्र्झलडवर ५-२ अशा मोठय़ा फरकाने विजय मिळवला. विश्वचषकापूर्वी प्रमुख खेळाडू फ्रँक रिबरी दुखापतग्रस्त झाल्याने फ्रान्सला धक्का बसला होता. रिबरीसारखा अनुभवी आणि निपुण खेळाडू गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. त्याच वेळी क्लब स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या समीर नासरीला संघातून वगळण्याचा आश्चर्यकारक निर्णय प्रशिक्षकांनी घेतला. नासरीला वगळण्याच्या निर्णयावर फुटबॉल वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटली होती. रिबरी, नासरी यांचा समावेश नसलेला फ्रान्सला प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागेल असा होरा फुटबॉल पंडितांनी व्यक्त केला होता. मात्र समीक्षक, आकडेवारी या सगळ्यांना खोटे ठरवत फ्रान्सने बाद फेरी गाठली आहे.
फ्रान्सला फुटबॉलचा मोठा इतिहास आहे. सातत्याने विश्वचषकात सहभागी होणारा संघ म्हणून त्यांची ख्याती आहे. १९९८ साली फ्रान्सच्या संघाने विश्वविजेतेपदावर कब्जा केला होता. अनेक वर्ष राबणाऱ्या खेळाडूंचे स्वप्न या करंडकाने साकारले आहे. एखाद्या घटकात अपवादात्मक कौशल्य हे फ्रान्सचे वैशिष्टय़ नाही. आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाडय़ांवर मूलभूत गोष्टींवर भर देत चिवट झुंजार खेळ हे फ्रान्सचे गुणवैशिष्टय़ आहे. मर्यादित गुणवत्तेच्या खेळाडूंसह संघबांधणी करण्याचे खडतर आव्हान फ्रान्सच्या प्रशिक्षकांनी पेलले आहे. मिकेल लान्ड्रेयू, पॅट्रिस इव्हरा, रिओ माव्हुबा या अनुभवी खेळाडूंच्या बरोबरीने रेमे काबेला, ल्युकास डिग्ने, पॉल पोग्बा, राफेल वरने या विशीही न गाठलेल्या खेळाडूंना सामावून घेण्याचे डावपेच यशस्वी ठरले आहेत.
फ्रान्सच्या या दणदणीत विजयामागची रहस्ये जाणून घेणे आवश्यक आहे. स्वित्र्झलड हा सामान्य संघ आहे, त्यांचे कच्चे दुवे नीट हेरून त्यानुसार फ्रान्सने जोरदार आक्रमण केले. बचाव जागतिक दर्जाचा नसल्याने स्वित्र्झलडचा संघ पिछाडीवर पडला. परंतु विश्वचषकात कोणत्याही संघाला कमी लेखण्याची चूक महागात पडू शकते. दुसऱ्या सत्रात शेवटच्या मिनिटांमध्ये स्वित्र्झलडने दोन गोल करत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. पहिल्या सत्रात फ्रान्सचा झंझावात त्यांनी रोखला असता तर कदाचित स्पर्धेतला आणखी एक आश्चर्यकारक विजय आपल्याला पाहायला मिळाला असता. करीम बेन्झेमा या विजयात चमकला. रिअल माद्रिदसारख्या मोठय़ा क्लबसाठी सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या करीमने देशाप्रतिही चांगली कामगिरी करू शकतो हे सिद्ध केले आहे. या विजयासाठी फ्रान्सचा संघ कौतुकास पात्र आहे, मात्र खरे आव्हान पुढेच आहे. अन्य देशांना साखळी गटातच बलाढय़ संघांचे आव्हान होते. फ्रान्सच्या बाबतीत हे समीकरण उलटे आहे. साखळी गटात होन्डुरास, इक्वेडोर आणि स्वित्र्झलड सारखे देश असल्याने फ्रान्सचा बाद फेरीतला प्रवेश पक्का मानला जात होता. आता पुढील फेऱ्यांमध्ये त्यांना नेदरलँड्स, ब्राझील, चिली, जर्मनी अशा मोठय़ा संघांचा सामना करायचा आहे. लिंबूटिंबू संघांना सहज लोळवणाऱ्या फ्रान्सला आता खऱ्या अर्थाने आपले कर्तृत्व सिद्ध करायचे आहे. एकहाती सामना जिंकून देईल असा खेळाडू त्यांच्याकडे नाही. एकत्रित सांघिक कामगिरीच्या जोरावर फ्रान्स सरशी साधतो हे प्रतिस्पध्र्यानी टिपले आहे. त्यामुळे आगामी काळात फ्रान्सचा संघ कशी कामगिरी करतो याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष एकवटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jun 2014 रोजी प्रकाशित
करून दाखवले
मोठा संघ म्हणून प्रसिद्धी नाही, वलयांकित खेळाडूंची फौज नाही. विश्वविजेतेपदाच्या संभाव्य दावेदारांमध्येही त्यांचे नाव अभावानेच सापडते.
Written by admin
First published on: 22-06-2014 at 06:26 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup netherlands and chile in scrap to avoid brazil