मेक्सिको सिटी : मेक्सिकोने बुधवारी रात्री झालेल्या अंतिम पात्रता फेरीतील सामन्यात एल सॅल्वॅडोरवर २-० असा विजय मिळवत सलग आठव्यांदा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. ‘कॉनकॅकॅफ’कडून (उत्तर आणि मध्य अमेरिका आणि कॅरेबियन फुटबॉल संघटनांचा विभाग) कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका हे तीन संघ थेट पात्र ठरले आहेत.
मेक्सिकोसाठी अॅझटेका स्टेडियममध्ये झालेल्या लढतीत युरील अँटुनाने १६व्या मिनिटाला गोल केला आणि नंतर पहिले सत्र संपण्याच्या आधी रॉल जिमिनेझने पेनल्टी किकच्या मदतीने गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. संघाच्या बचावफळीने अखेपर्यंत ही आघाडी कायम ठेवत विजय सुनिश्चित केला. यापूर्वी, रविवारी टोरंटो येथे कॅनडाने जमैकाला ४-० असे नमवत ३६ वर्षांनंतर पहिल्यांदाचा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
पराभवानंतरही अमेरिकेला दिलासा
सॅन जोस : बुधवारी अखेरच्या पात्रता सामन्यात कोस्टा रिकाकडून ०-२ अशा पराभवानंतरही अमेरिकेने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी स्थाननिश्चिती केली आहे. अमेरिकेचा संघ २०१८मध्ये रशिया येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पात्र ठरला नव्हता. कोस्टा रिकाकडून जुआन पाब्लो व्हर्गास (५१वे मि.) व अँथनी काँट्रेरास (५९ वे. मि.) यांनी गोल झळकावत संघाच्या विजयात योगदान दिले. गेल्या आठवडय़ात अमेरिकेने पनामावर ५-१ असा विजय मिळवला होता. त्यामुळे उत्तम गोलफरकाच्या बळावर अमेरिकेचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला.