जिनेव्हा : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर अमेरिकेत होणारे सामने मेक्सिकोत स्थानांतरित करण्याचे इराणचे प्रयत्न फोल ठरले आहेत. ‘फिफा’ने पूर्वनियोजित वेळापत्रक बदलण्यास नकार दिला आहे.

इराण संघाने विश्वचषक स्पर्धेसाठी अमेरिकेत येणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही अशी भूमिका ट्रम्प यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर इराणच्या विश्वचषक स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. याच सुमारास इराण फुटबॉल महासंघाने आपले सामने मेक्सिकोत स्थानांतरित करण्यासाठी ‘फिफा’ बरोबर चर्चा सुरू असल्याचे सांगितले.

मेक्सिकोच्या अध्यक्षा क्लॉडिया शिनबॉम यांनी या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शविली होती. अर्थात, यामध्ये ‘फिफा’ची भूमिका महत्त्वाची राहील. त्यांच्या निर्णयानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ असे देखील त्या म्हणाल्या.

मात्र, असा बदल करण्याची कोणतीही योजना नसल्याचे ‘फिफा’ने स्पष्ट केले. इराणने अशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले असले, तरी त्या वृत्ताला कुणाकडूनच दुजोरा मिळत नव्हता. या चर्चेचे वृत्त पसरल्यावर चोवीस तासात ‘फिफा’ने आपले मत व्यक्त केले असून, वेळापत्रक तीन महिन्यांपूर्वी निश्चित झाले आहे. ते बदलता येत नाही. स्पर्धेच्या नियोजनानुसार सामने पार पडतील अशी आम्हाला आशा आहे, अशी भूमिका ‘फिफा’ने घेतली आहे.