वृत्तसंस्था, अटलांटा

एकीकडे विश्वविजेतेपद टिकवण्याचे अर्जेंटिनाचे स्वप्न, तर दुसरीकडे तब्बल सहा दशकांनंतर पुन्हा विश्वचषक जिंकण्याची इंग्लंडची महत्त्वाकांक्षा… या पार्श्वभूमीवर यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील दुसरी उपांत्य लढत रोमांचक ठरण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, वलयांकित आक्रमक लिओनेल मेसी आपल्या प्रथितयश कारकीर्दीत प्रथमच ‘थ्री-लायन्स’ अर्थात इंग्लंडचा सामना करेल. त्याला रोखण्याचेच इंग्लंडपुढे सर्वांत मोठे आव्हान असेल. इंग्लंडच्या हॅरी केन आणि ज्युड बेलिंगहॅम या तारांकितांच्या कामगिरीवरही चाहत्यांची नजर असेल.

या दोन संघांमधील प्रत्येक सामना हा केवळ फुटबॉलपुरता मर्यादित राहत नाही. १९८६च्या विश्वचषकातील दिएगो मॅराडोना यांचा वादग्रस्त ‘हँड ऑफ गॉड’ गोल, त्याच सामन्यातील अप्रतिम वैयक्तिक गोल, १९९८ मध्ये डेव्हिड बेकहॅमला मिळालेले लाल कार्ड आणि दोन्ही देशांतील फॉकलंड बेटांवरील ऐतिहासिक वाद यामुळे इंग्लंड-अर्जेंटिना लढत नेहमीच विशेष ठरली आहे. तब्बल २४ वर्षांनंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा स्पर्धात्मक सामन्यात आमनेसामने येत असल्याने या लढतीची उत्सुकता आणखी वाढली आहे. अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी मात्र या ऐतिहासिक पार्श्वभूमीला फारसे महत्त्व दिलेले नाही. ‘हा फक्त फुटबॉलचा सामना आहे. त्यापलीकडे आम्ही काहीही विचार करत नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

संघर्षमय प्रवास

यंदाच्या विश्वचषकात इंग्लंडचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास संघर्षमय आणि नाट्यमय ठरला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला क्रोएशियावर दणदणीत विजय मिळवणार्‍या इंग्लंडला त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर झुंज द्यावी लागली. डीआर काँगोविरुद्ध हॅरी केनच्या दोन गोलच्या जोरावर विजय मिळवल्यानंतर मेक्सिकोविरुद्ध दहा खेळाडूंवर खेळत त्यांनी ३-२ अशी संस्मरणीय बाजी मारली. त्यानंतर नॉर्वेविरुद्ध अतिरिक्त वेळेत ज्युड बेलिंगहॅमने केलेल्या विजयी गोलामुळे इंग्लंडने उपांत्य फेरी गाठली.

बाद फेरीत कस

अर्जेंटिनासाठीही हा प्रवास तितकाच आव्हानात्मक ठरला आहे. साखळी फेरी सहज पार केल्यानंतर बाद फेरीत अर्जेंटिनाचा कस लागला. केप व्हर्डे, इजिप्त आणि स्वित्झर्लंड या तिन्ही तुलनेने दुबळ्या संघांनी अर्जेंटिनाला सहजासहजी विजय मिळवू दिला नाही. तिन्ही सामने अतिरिक्त वेळेपर्यंत गेल्यानंतरच अर्जेंटिनाने उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे अनुभवी खेळाडूंनी भरलेल्या अर्जेंटिना संघावर सलग लांबलेल्या सामन्यांचा शारीरिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मेसीची सलग नऊ विश्वचषक सामन्यांतील गोलची मालिका स्वित्झर्लंडविरुद्ध खंडित झाली असली, तरी त्याचा खेळातील प्रभाव कायम आहे. त्यामुळे ३९ वर्षीय मेसीचीच कामगिरी पुन्हा एकदा निर्णायक ठरण्याची दाट शक्यता आहे.

केन, बेलिंगहॅमवरच भिस्त

इंग्लंडच्या आक्रमणाची धुरा हॅरी केन आणि ज्युड बेलिंगहॅम या जोडीने प्रभावीपणे सांभाळली आहे. दोघांनी प्रत्येकी सहा गोल करत संघाच्या १३ पैकी १२ गोलमध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे अर्जेंटिनाविरुद्ध त्याच्यावरच इंग्लंडची भिस्त असेल. उपउपांत्यपूर्व फेरीत मेक्सिको

आणि उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वे संघाविरुद्ध दोन गोल करत बेलिंगहॅमने इंग्लंडच्या उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासात निर्णायक भूमिका बजावली. अँथनी गॉर्डन आणि बुकायो साका यांनी प्रत्येकी तीन गोलसाहाय्य (असिस्ट) केले आहे. परंतु साका आणि मध्यरक्षक डेक्लन राईस यांच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्न असल्याने ते सुरुवातीपासून खेळणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मेसीला साथ गरजेची

‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत आठ गोलसह आघाडीवर असलेला ३९ वर्षीय मेसी हाच अर्जेंटिनाचा सर्वांत मोठा आधार आहे. उपांत्यपूर्व फेरीपर्यंत त्याने प्रत्येक सामन्यात गोल केला. विश्वचषकातील एकूण २१ गोलसह त्याने स्वत:चाच विक्रम आणखी भक्कम केला आहे. मात्र, त्याला अन्य सहकार्‍यांची साथ गरजेची आहे. यंदाच्या स्पर्धेत त्याच्या व्यतिरिक्त अर्जेंटिनाच्या कोणत्याही खेळाडूला दोनहून अधिक गोल करता आलेले नाहीत. गेल्या सामन्यात मेसीने गोल न करताही अर्जेंटिनाने विजय मिळवला, ही त्यांच्यासाठी सकारात्मक बाब. मात्र, बाद फेरीतील तीन सामन्यांत अर्जेंटिनाने तीन सामन्यांत पाच गोल स्वीकारल्याने त्यांच्या बचावफळीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

विश्वचषकात नाट्यमय इतिहास 

’ १९६२ (साखळी फेरी)

अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यातील पहिला विश्वचषक सामना. इंग्लंडचा ३-१ विजय.

’ १९६६ (उपांत्यपूर्व फेरी)

इंग्लंडचा अर्जेंटिनावर १-० विजय. या सामन्यात अर्जेंटिनाचा कर्णधार अंटोनियो रॅटिनला रेड कार्ड मिळाले. मात्र, त्याने

बाहेर पडण्यास नकार दिल्याने आणि अन्य कृतीमुळे वातावरण तंग झाले होते.

’ १९८६ (उपांत्यपूर्व फेरी)

अर्जेंटिनाचा इंग्लंडवर २-१ विजय. विश्वचषक इतिहासातील सर्वांत गाजलेल्या लढतींपैकी एक. मॅराडोना यांचा ‘हँड ऑफ गॉड’ आणि वैयक्तिक कौशल्याच्या जोरावर केलेला

‘गोल ऑफ द सेंच्युरी’ याच सामन्यात.

’ १९९८ (राऊंड ऑफ १६)

२-२ अशा बरोबरीनंतर शूट-आऊटमध्ये अर्जेंटिना विजयी. १८ वर्षांच्या मायकेल ओवेनचा भन्नाट गोल आणि डिएगो सिमिओनीला लाथ मारल्यामुळे डेव्हिड बेकहॅमला मिळालेले रेड कार्ड हे या सामन्यातील लक्षवेधी क्षण.

’ २००२ (साखळी फेरी) 

इंग्लंडची १-० बाजी. १९९८ मध्ये लाल कार्ड मिळवणार्‍या बेकहॅमचा पेनल्टीवर गोल आणि इंग्लंडचा निसटता विजय.

अर्जेंटिना (रचना : ४-४-२)

गोलरक्षक : एमि मार्टिनेझ

बचावपटू : नाहुएल मोलिना, ख्रिस्तियन रोमेरो, लिसांड्रो मार्टिनेझ, टालियाफिकोे

मध्यरक्षक : लिआंड्रो पेरेडेस, रॉड्रिगो डी पॉल, एन्झो फर्नांडेझ, ॲलेक्सिस मॅक ॲलिस्टर

आक्रमक : लिओनेल मेसी, ज्युलियन अल्वारेझ

इंग्लंड (रचना : ४-२-३-१)

गोलरक्षक : जॉर्डन पिकफर्ड

बचावपटू : निको ओरायली, मार्क गुएही, जॉन स्टोन्स, एझरी कोन्सा

मध्यरक्षक : एलियट अँडरसन, डेक्लन राईस/एबेरेची एझे

आक्रमक : अँथनी गॉर्डन, ज्युड बेलिंगहॅम, बुकायो साका

आघाडीपटू : हॅरी केन

मी जवळपास सर्व मोठ्या संघांविरुद्ध खेळलो आहे, पण इंग्लंडविरुद्ध खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर मैदानात उतरणे माझ्यासाठी खूप खास असेल. – लिओनेल मेसी

वेळ: मध्यरात्री १२.३० वा. (गुरुवार)  थेट प्रक्षेपण :  ‘युनाइट ८ स्पोर्ट्स’, ‘झी ५’