मुंबई : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढती रविवारी निश्चित झाल्या. फ्रान्स आणि स्पेन यांच्यापाठोपाठ इंग्लंड आणि अर्जेंटिनाने आपापले उपांत्यपूर्व फेरीचे सामने जिंकून वाटचाल सुरू ठेवली.

योगायोग म्हणजे फ्रान्स, स्पेन, अर्जेंटिना आणि इंग्लंड हे चारही संघ फिफा क्रमवारीत अव्वल चार क्रमांकांवर आहेत. चार आजी-माजी जगज्जेते विरुद्ध चार बिगर-जगज्जेत्या संघांतील द्वंद्व अखेर प्रस्थापित संघांनीच जिंकले. चारही उपांत्यपूर्व लढतींपैकी एकही पेनल्टी शूट-आऊटपर्यंत न जाण्याचा दुर्मीळ प्रकार यंदा दिसून आला. तसेच, १९९०नंतर प्रथमच आणि विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात केवळ तिसर्‍यांदाच उपांत्य फेरीतील प्रत्येक संघाने किमान एकदा तरी विश्वचषक जिंकलेला आहे. 

अर्जेंटिना आणि फ्रान्स हे गेल्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत भिडले होते. त्यांच्यात जगज्जेतेपदासाठी फेरलढतीची शक्यता नाकारता येत नाही. फ्रान्सचा गोलधडाका, स्पेनचा अभेद्य बचाव, इंग्लंडची बेलिंगहॅम-केन जोडी आणि अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीची ऊर्जा आणि इच्छाशक्ती त्या-त्या संघांसाठी निर्णायक ठरेल.